केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे अमेरिकेच्या आयात शुल्कावर विधान
नवी देहली – भारत दबावाखाली कोणताही करार करत नाही. आम्ही बंदुकीच्या धाकावर व्यवहार करत नाही. जेव्हा आम्हाला योग्य वेळ मिळेल, तेव्हाच आम्ही संभाषणासाठी पुढे जाऊ, अशा शब्दांत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी अमेरिकेच्या आयात शुल्कावर भारताची भूमिका मांडली आहे. ‘जेव्हा परिस्थिती आमच्या बाजूने असते, तेव्हाच भारत व्यापारावर वाटाघाटी करतो’, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. ते देहलीत आयोजित करण्यात आलेल्या ‘इटली-भारत व्यवसाय, विज्ञान आणि तंत्रज्ञान’ परिषदेत बोलत होते.
पियुष गोयल पुढे म्हणाले की, भारत अमेरिका, ब्रिटन, युरोपियन युनियन आणि जगातील इतर अनेक देश यांच्यासमवेत व्यापार चर्चा करत आहे. या सर्व चर्चा ‘भारत प्रथम’ या भावनेने चालू आहेत आणि ही प्रक्रिया वर्ष २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्यास उपयुक्त ठरेल.