सदनिका खरेदीत फसवणूक झालेल्या ग्राहकाला हानीभरपाईसह २६ लाख रुपये मिळाले

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने बांधकाम व्यावसायिकाला दिला आदेश

सिंधुदुर्ग – कणकवली येथील बांधकाम व्यावसायिकाने सदनिका खरेदी व्यवहारात ग्राहकाची फसवणूक केली. या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने संबंधित ग्राहकाला व्याजासह रक्कम देण्याचा आदेश व्यावसायिकाला दिला. त्यामुळे ग्राहक योगेश गणेश ढवण यांना व्याजासह २६ लाख रुपये भरपाई मिळाले आहेत. या प्रकरणास एकूण ९ वर्षांचा कालावधी लागला आहे. तोपर्यंत ग्राहकाला मनस्ताप सोसावा लागला.

कणकवली तालुक्यातील हरकूळ बुद्रुक येथील ढवण यांनी कणकवली येथील एका बांधकाम व्यावसायिकाकडून साठे खताने एक सदनिका खरेदी केलेली होती; परंतु बांधकाम व्यावसायिकाने ढवण यांना त्यांची सदनिका नियोजित वेळी दिली नव्हती. या प्रकरणांत ढवण यांची पूर्णतः फसवणूक झालेली होती. बँकेचे कर्ज काढल्याने त्याचे हप्ते भरावे लागत होते; मात्र सदनिका मिळालेली नव्हती. त्यामुळे ढवण हतबल झाले होते. अखेर ढवण यांनी सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे बांधकाम व्यावसायिकाच्या विरोधात तक्रार केली होती. त्याचा निकालही ढवण यांच्या बाजूने लागला अन् त्या व्यावसायिकाला संपूर्ण रक्कम व्याजासह ढवण यांना देण्याचा आदेश देण्यात आला होता; मात्र आयोगाच्या आदेशालाही तो बांधकाम व्यावसायिक मानत नव्हता. अखेर त्या व्यावसायिकाला अटक करून आयोगासमोर आणण्यात आले. आयोगाच्या नियमांनुसार त्या बांधकाम व्यावसायिकाला शिक्षा आणि दंड होणार होता. ग्राहक आयोगाने ग्राहकाला संपूर्ण रक्कम व्याज आणि हानीभरपाईसह देण्याचा आदेश देऊन शेवटची संधी दिली. त्यानंतर बांधकाम व्यावसायिकाने ग्राहक ढवण यांना २६ लाख रुपये दिले.

सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोगाच्या अध्यक्षा इंदुमती मलुष्टे आणि सदस्य योगेश खाडिलकर यांच्यासमोर या तक्रारीची सुनावणी झाली.