महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड जिल्ह्यांतील २०० हून अधिक मंदिर विश्वस्तांचा सहभाग

सोलापूर – श्री तुळजाभवानी मंदिर विकास आराखडा आणि पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरातील संवर्धनाचे काम करतांना पुरातत्व विभागाने मंदिर, देवतांच्या मूर्ती, मंदिरांतील पुरातन परंपरा, तसेच मंदिराचे ऐतिहासिक अन् पौराणिक महत्त्व यांची हेळसांड करू नये. असे झाल्यास मंदिर विश्वस्त, भक्त आणि हिंदू रस्त्यावर उतरून याचा विरोध केल्याविना रहाणार नाही. मंदिर महासंघाचाही याला विरोध असेल. मंदिर संस्कृती रक्षणासाठी मंदिर विश्वस्त आणि पुजारी यांचा परस्पर समन्वय अन् संघटन आवश्यक आहे. सध्याच्या श्री तुळजाभवानी मंदिरातील पुजार्यांवर होत असलेल्या आरोपांविषयी दोषींवर निश्चित कारवाई करावी; परंतु नॅरेटिव्ह (खोटी कथानके) करून पुजार्यांची अपकीर्ती करणे थांबवावे. कोणत्याही मंदिरांच्या संदर्भातील नॅरेटिव्ह वेळीच खोडून काढली पाहिजेत, असे ठाम मत मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट यांनी व्यक्त केले. ते १० एप्रिल या दिवशी पद्मावती कन्व्हेन्शन हॉल, अक्कलकोट रोड, एम्.आय.डी.सी. येथे आयोजित जिल्हास्तरीय महाराष्ट्र मंदिर-न्यास अधिवेशनात बोलत होते. या अधिवेशनात सोलापूर, बीड, धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांतील मंदिर विश्वस्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिवेशनाचा प्रारंभ सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, श्री. सुनील घनवट, निवृत्त सहधर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख, ‘प्रज्ञापुरी ज्ञानपिठा’चे पीठासन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित, श्री तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक श्री. सत्यनारायण गुर्रम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाला. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश पू. (कु.) दीपाली मतकर यांनी वाचला, तर अधिवेशनाचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिनेश पुजारे यांनी केले. या वेळी श्री. दिलीप देशमुख यांनी मंदिरांच्या संदर्भातील कायदेविषयक मार्गदर्शन केले.
मंदिरे हिंदूंची आधारशीला होण्यासाठी प्रयत्न करावेत ! – सद्गुरु स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था![]() पुरातन काळापासूनच मंदिरांनी सांस्कृतिक इतिहास जपण्याचे कार्य केले आहे. हिंदु समुदायाला एकत्रित आणण्याचे महान कार्य मंदिरांनी केलेले आहे. पूर्वी राजे- महाराजे यांनी मंदिरांचे जतन आणि संवर्धन केले आहे; मात्र सध्या सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. येणार्या काळात मंदिरे हिंदूंची आधारशीला बनण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. प्रत्येक मंदिर हे हिंदूंना धर्मशिक्षण देणारे केंद्र व्हायला हवे. |
तुळजापूर येथील पुजार्यांवर खोटे आरोप करणार्यांवर कायदेशीर कारवाई करू ! – अधिवक्ता शिरीष कुलकर्णी, तुळजापूर
‘श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुजारी हे अमली पदार्थांच्या व्यापार प्रकरणात गुंतलेले आहेत’, अशा आरोपाखाली त्यांची अपकीर्ती केली जात आहे. दोषी कोण आहेत ? हे न्यायालय ठरवेल आणि त्यांना योग्य ती शिक्षाही देईल; मात्र मंदिर समितीतील कोणत्याही शासकीय अधिकार्याने आरोप सिद्ध होण्यापूर्वी निरपराध पुजार्यांवर कारवाई करू नये, अन्यथा आम्ही कायदेशीररित्या त्या अधिकार्यांना धडा शिकवू, असे मी या मंदिर परिषदेत घोषित करतो.
श्री तुळजापूर देवस्थान घोटाळ्यात ८ कोटी ५ लाख रुपयांचा अपहार समोर आणला ! – किशोर गंगणे, पुजारी मंडळ माजी अध्यक्ष, तुळजापूर
मंदिरे जोपासण्याचे काम भक्तांचे आहे, सरकारचे नाही. शासन अधिग्रहित श्री तुळजापूर देवस्थानातील सरकारी अधिकारी आणि ठेकेदार यांनी केलेला ८ कोटी ५ लाख रुपयांचा घोटाळा आम्ही न्यायालयीन लढ्याच्या माध्यमातून समोर आणला; मात्र या प्रकरणातील आरोपींवर अद्याप कारवाई झालेली नाही.
उपस्थित मंदिर विश्वस्त
‘रिद्धि सिद्धि महागणपति मंदिरा’चे अध्यक्ष श्री. अशोक कोळी, ‘पोषम्मा मंदिरा’चे विश्वस्त श्री. प्रकाश चन्ना, ‘मल्लिकार्जुन मंदिरा’चे विश्वस्त श्री. दिलीप पाटील, ‘श्री मुक्तेश्वर मंदिरा’चे विश्वस्त श्री. विजय दास, ‘श्री गणेश मंदिरा’चे विश्वस्त श्री. वेणूगोपाल म्याना, तुळजापूर येथील दशावतार मठ, मठाधीश महंत मावजीनाथ महाराज, सोमवारगिरी मठ, मठाधीश महंत इच्छागिरी महाराज, अरण्य गोवर्धन मठ, मठाधीश महंत व्यँकटारण्य महाराज