
कराड, ९ एप्रिल (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने १७ ते १९ मे या कालावधीत गोवा येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या वाढदिवसानिमित्त हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांच्या हस्ते कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार अतुल भोसले यांना या महोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले.
आमदार अतुल भोसले यांच्यासमवेत झालेल्या चर्चेमध्ये त्यांनी साधना आणि मंदिर संघटन यांविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला. या वेळी आमदार भोसले म्हणाले की, धर्मशिक्षणाच्या माध्यमातून भक्तांना मंदिरांशी जोडणे, हे पुष्कळ महत्त्वाचे आहे. मंदिरे स्वच्छ ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी यांचे संघटन करून कराडमध्ये एखादे अधिवेशन घेण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो. शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण मी स्वीकारले असून या महोत्सवासाठी निश्चित उपस्थित राहीन. या निमित्ताने माझ्यासाठी काही सेवा असल्यास मला अवश्य सांगावे.