
संत जरी झाला, तरी त्याने ४ माणसांसारखेच वागावे. अत्यंत निर्भयता हा संतांचा पहिला गुण होय; कारण ‘सर्व ठिकाणी मीच आहे’, ही भावना झाल्यावर भयाचे कारणच उरत नाही. साधूंच्या अंत:करणामध्ये भयाचा संकल्प नसल्यामुळे जंगली वाघाकडेही निर्भयतेने नजरानजर केली, तर तो अंगावर येत नाही. याखेरीज साधूंच्या शुद्ध अंत:करणाचाही त्याच्यावर परिणाम होतो. अशा रितीने संतांच्या अंत:करणाची प्राणिमात्रांनासुद्धा जाणीव असते. अशा संतांचा सहवास मिळणे, ही फार भाग्याची गोष्ट आहे. परमेश्वराचे प्रेम लागणे किंवा सतत मुखात नाम येणे, हेच संतांच्या संगतीत राहून साधायचे असते.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज