‘सनातन संस्थेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक (सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के) आणि श्री. राम होनप) हे गुरुकृपेने सूक्ष्म ज्ञान मिळवण्याची सेवा करत आहेत. त्यांचा जन्म ‘सध्याच्या काळात का झाला आहे ?’, याविषयी मला देवाच्या कृपेमुळे सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान पुढे दिले आहे.

१. स्वतःचा उद्धार करून घेणे
सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांचे गत जन्मांतील काही कर्मदोष आहेत. ‘त्यांतून लवकर सुटका व्हावी आणि आध्यात्मिक प्रगती व्हावी’, यांसाठी अशा जिवांना मोक्षगुरूंची आवश्यकता होती. त्या साधकांना ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे अवतारी असून तेच आपला उद्धार करणार आहेत’, हे ठाऊक होते. यासाठी त्यांनी जन्म घेण्यासाठी सध्याच्या काळाची निवड केली.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी (गुरूंनी) दिलेला ज्ञानाचा वारसा पुढे चालू ठेवणे
परात्पर गुरु डॉक्टरांचे मुख्य कार्य ‘ज्ञानमार्गाने’ असून त्यांनी ज्ञानाद्वारे ‘सनातन धर्म’, ‘अध्यात्म’ आणि ‘गुरुकृपायोग’ यांची ओळख समाजाला करून दिली. काही जिज्ञासूंसाठी या ज्ञानाचा विस्तार पुढील काळातही होणे आवश्यक आहे.
सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांमध्ये अल्प-अधिक प्रमाणात सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता आहे. त्यामुळे ‘परात्पर गुरु डॉक्टरांचा ज्ञानाचा वारसा पुढे चालू रहावा, यासाठी त्यांना सध्याच्या काळात जन्म मिळणे’, हे ईश्वरी नियोजन आहे. त्यांना मिळणार्या सूक्ष्म ज्ञानाद्वारे जिज्ञासू आणि साधक यांच्या साधनेला चालना मिळण्यास साहाय्य होणार आहे.
३. सनातन धर्माची ज्ञानज्योत प्रज्वलित ठेवणे
सनातन धर्माच्या मंदिररूपाचा पाया, मध्य आणि कळस हे सर्व ईश्वरी ज्ञानच आहे. ईश्वरी ज्ञानामुळे सनातन धर्माचे महत्त्व जिज्ञासू आणि साधक यांना अवगत होते. पृथ्वीवर सनातन धर्माची ज्ञानज्योत प्रज्वलित ठेवण्याची सेवा ईश्वर सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या माध्यमातून करून घेणार आहे.

४. परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर एका ज्ञानप्राप्तकर्त्या साधकाच्या माध्यमातून सनातन धर्माच्या वैश्विक कार्याला गती प्राप्त होणार असणे
सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांपैकी एक साधक (सूक्ष्मातून नाव मिळाले नाही.) संपूर्ण विश्वात सनातन धर्माच्या उत्थानाचे कार्य त्याला मिळणार्या ईश्वरी ज्ञानाच्या माध्यमातून करणार आहे. ‘या कार्यातून त्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे’, हे त्या साधकाला मागील जन्मी ठाऊक होते; परंतु यासाठी त्याला अवतारी गुरूंचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यांची आवश्यकता होती. त्यामुळे त्याने सध्याच्या काळात जन्म घेतला. त्या साधकाला परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद प्राप्त झाला की, सनातन धर्माची कीर्ती ज्ञानाद्वारे जगभर पसरवल्याने त्याला अनेक जिवांच्या उद्धाराचे कार्य करता येणार आहे.
४ अ. एक सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता साधक समाजाला सहस्रो वर्षे प्रेरणादायी ठरणार्या ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाचा प्रसार करणार असणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांच्या जलद आध्यात्मिक प्रगतीसाठी सध्याच्या काळाला अनुसरून ‘गुरुकृपायोग’ या योगमार्गाची निर्मिती केली. एक सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता साधक पुढे ‘या योगमार्गाचा प्रसार करणे, सूक्ष्म ज्ञानाद्वारे त्याचा विस्तार करणे आणि त्या योगे अनेकांच्या आध्यात्मिक प्रगतीला चालना देणे’, हे कार्य करणार आहे. त्यामुळे ‘गुरुकृपायोग’ हा योगमार्ग पुढे सहस्रो वर्षे समाजाला प्रेरणादायी ठरणार आहे. या कारणास्तव ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि एका सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ता साधक यांची भेट’, म्हणजे समाजासाठी ‘उत्तम योग’ मानला आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.१.२०२५)
|