Europe Records Hottest Month : मार्च २०२५ हा ठरला युरोपमधील सर्वांत उष्ण महिना !

हवामान संस्था ‘कॉपर्निकस’चा दावा

बॉन (जर्मनी) – युरोपातील हवामान आणि हवामान पालट माहिती संस्था ‘कॉपर्निकस’ने दावा केला आहे की, मार्चमध्ये जागतिक तापमान अधिक होते. मार्च २०२५ हा युरोपमधील आतापर्यंतचा सर्वांत उष्ण महिना ठरला. जागतिक स्तरावर मार्च २०२५ हा दुसरा सर्वांत उष्ण महिना ठरला. जागतिक उष्णतेतील वाढीमुळे २०२४ हे वर्ष सर्वांत उष्ण वर्ष म्हणून नोंद झाले आहे.

हवामान पालटामुळे मुसळधार पाऊस आणि पूर यांचा धोका वाढतो !

युरोपीयन हवामान संस्थेच्या मते, मार्च २०२५ औद्योगिक काळापासूनच्या कोणत्याही मार्च महिन्यापेक्षा १.६ अंश सेल्सिअसने जास्त उष्ण होता. हवामानशास्त्रज्ञांनी वाढत्या तापमानाविषयी चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपण मानवनिर्मित हवामान पालटाच्या विळख्यात सापडलो आहोत. शास्त्रज्ञांनी चेतावणी दिली आहे की, तापमानात प्रत्येक एक अंश सेल्सिअस वाढ झाल्याने आता उष्णतेच्या लाटा, अतीवृष्टी आणि पूर यासारख्या समस्यांची वारंवारता आणि तीव्रता वाढेल. शास्त्रज्ञांचे  म्हणणे आहे की, हवामान पालटामुळे मध्य आशियामध्येही उष्णता वाढली आहे.

भारतातील अनेक राज्यांत उष्णतेची लाट !

भारतातही तीव्र उष्णतेचा काळ चालू झाला आहे. देशाच्या वायव्य राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची चेतावणी देण्यात आली आहे. राजस्थानमध्ये रात्रीच्या तापमाननेही ४५ अंश सेल्सिअस ओलांडले आहे. राजधानी देहलीत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोचले आहे.

संपादकीय भूमिका

ही आहे आधुनिक विज्ञानाने मानवाला दिलेली ‘देणगी’ ! निर्सगाचा र्‍हास टाळण्यासाठी प्राचीन ‘ऋषि-कृषी संस्कृती’, तसेच निसर्गानुकुल जीवनपद्धती यांकडे पुन्हा वळण्याला पर्याय नाही !