चैत्री यात्रा कालावधीत नदीपात्रात मुबलक आणि स्वच्छ पाणी राहील, याची दक्षता घ्या ! – सचिन इथापे, प्रांताधिकारी, पंढरपूर

चैत्री यात्रा कालावधीच्या संदर्भात अधिकार्‍यांच्या बैठकीत बोलतांना प्रांताधिकारी सचिन इथापे (डावीकडून दुसरे), तसेच अन्य अधिकारी

पंढरपूर – चैत्र शुक्ल एकादशीची (८ एप्रिल) यात्रा २ ते १२ एप्रिल या कालावधीत आहे. या वेळी श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. यात्रेत भाविक आणि वारकरी यांसाठी चंद्रभागेचे स्नान पुष्कळ पवित्र मानले जाते, तसेच चैत्री यात्रा कालावधीत चंद्रभागा नदीमध्ये कावडी स्नानासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येणार्‍या भाविकांना चंद्रभागा नदीपात्रात पवित्र स्नान करता यावे. यासाठी संबंधित विभागाने चंद्रभागा नदीपात्रात मुबलक आणि स्वच्छ पाणी राहील, याची दक्षता घेऊन नियोजन करावे, अशा सूचना प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी दिल्या. (अशा सूचना का द्याव्या लागतात ? प्रशासनातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांना ते लक्षात येत नाही का ? – संपादक)

चैत्री यात्रा नियोजनाविषयी प्रांत कार्यालय येथे बैठक घेण्यात आली. बैठकीस तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी प्रशांत जाधव यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते. या वेळी प्रांताधिकारी इथापे पुढे म्हणाले, ‘‘पंढरपुरात चैत्री यात्रा कालावधीत ३ ते ४ लाख भाविक येतात. या यात्रेत भाविकांच्या आरोग्य सुरक्षेला आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावे. नगरपालिका प्रशासनाने शहरातील अतिक्रमणे तात्काळ काढावीत. मुबलक स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा. नदीपात्रात कोणतेही खासगी वाहन जाणार नाही, याची दक्षता घ्यावी. दर्शनरांगेतील भाविकांना उन्हाचा त्रास जाणवू नये यांसाठी मंदिर समितीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. महावितरण विभागाने अखंडीत आणि सुरक्षित वीजपुरवठा करावा. प्रदक्षिणा मार्गावरील रोहित्रांना आवरण घालावे. आवश्यक ठिकाणी सूचना फलक लावावेत.’’

या वेळी मुख्याधिकारी प्रशांत जाधव म्हणाले, ‘‘यात्रा कालावधीत येणार्‍या भाविकांना स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कूपनलिका, हातपंपाची पाणी पडताळणी करण्यात येत आहे. स्वच्छतेसाठी जादा हंगामी स्वच्छता कर्मचार्‍यांची  नेमणूक करण्यात येणार आहे. ६५ एकरमध्ये भाविकांच्या सुविधेसाठी पाणी, वीज, स्वच्छता आदी सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.’’