माटणे येथे मातीच्या साठ्याची छायाचित्रे काढणार्या पत्रकारांना धमकी दिल्याचे प्रकरण
दोडामार्ग – तालुक्यातील माटणे येथे मोठ्या प्रमाणात दिसलेल्या मातीच्या साठ्याची छायाचित्रे काढणार्या तालुक्यातील ३ पत्रकारांना धमकावण्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी मातीचा साठा ज्या भूमीत करून ठेवला होता, त्या भूमीच्या मालकाला महसूल विभागाने २ लाख ९१ सहस्र ६०० रुपये दंड ठोठावला आहे. पत्रकारांना धमकावल्यानंतर महसूल विभागाने या भूमीतून ८१ ब्रास माती शासनाधीन (जप्त) केली होती.
माटणे येथील श्री देव पूर्वाचारी काट्याजवळ मुख्य रस्त्याला लागूनच मातीसाठा करण्यात आल्याचे तालुक्यातील ३ पत्रकारांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पत्रकारांनी त्या मातीची छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला असता विठ्ठल उपाख्य सूर्या नाईक आणि त्यांचा मुलगा नवनाथ नाईक या दोघांनीही पत्रकारांना धमकी दिली होती. मातीच्या या साठ्याविषयी पत्रकारांनी जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना माहिती दिल्यानंतर महसूलच्या पथकाने घटनास्थळाचा पंचनामा केला असता तेथे ८१ ब्रास मातीचा साठा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे महसूल प्रशासनाने संबंधित भूमीचे मालक रामचंद्र विनायक तेली यांना नोटीस पाठवली. या नोटिसीला तेली यांनी दिलेले उत्तर महसूल विभागाने अमान्य करत कारवाई केली.
प्रभारी तहसीलदार प्रज्ञा राजमाने यांनी दंड भरण्याविषयी तेली यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये ‘हा दंड ७ दिवसांत भरावा अन्यथा फौजदारी कारवाई आणि दंड रकमेचा बोजा ७/१२ वर चढवण्यात येईल’, असे नमूद केले आहे.