‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांची पुरातत्व विभागाला सूचना
पंढरपूर – श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि परिवार देवता मंदिर जतन, संवर्धन अन् जिर्णोद्वाराचे काम पुरातत्व विभागाकडून चालू आहे. सदर कामाच्या अनुषंगाने श्रींच्या गाभार्यातील दगडी कामाच्या कोटींगसाठी (लेप लावण्यासाठी) पुरातत्व विभागाने मंदिर समितीस तात्काळ लेखी अहवाल सादर करावा. सध्या चालू असलेली कामे आषाढी यात्रेच्या पूर्वी म्हणजे ५ जून पूर्वी पूर्ण करावीत, अशा पुरातत्व विभागास सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती ‘श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती’चे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पत्रकारांना दिली.
मंदिर जतन, संवर्धन कामाचा, तसेच टोकन दर्शन प्रणाली चालू करण्याच्या संदर्भात ‘टी.सी.एस्.’ आस्थापनाच्या समवेत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. काही अपरिहार्य कारणास्तव सदरची बैठक रहित करण्यात आली; मात्र मंदिर जतन आणि संवर्धन, तसेच ‘टोकन दर्शन प्रणाली’ची चाचणी घेण्याविषयी आढावा बैठक पार पडली. या प्रसंगी विविध सदस्यांसमवेत पुरातत्व विभागाचे साहाय्यक संचालक डॉ. विलास वहाणे, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांसह अन्य अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये तिरुपती, शिर्डी देवस्थान यांच्या धर्तीवर ‘टोकन दर्शन प्रणाली’ चालू करण्याचे प्रस्तावित आहे, त्याची चाचणी घेण्याचा आढावा घेण्यात आला. टोकन दर्शन प्रणालीच्या चाचणीचे ३ टप्पे करण्यात आले असून अल्प गर्दीच्या दिवशी पहिली चाचणी, नंतर मध्यम गर्दीच्या दिवशी दुसरी आणि महिन्याच्या एकादशीच्या दिवशी तिसरी अशा एकूण ३ चाचण्या घेण्यात येणार असून या प्रणालीत कोणत्याही प्रकारची त्रुटी रहाणार नाही, याची दक्षता घेऊन भाविकांना सुलभ आणि जलद दर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न मंदिर समितीचा रहाणार असल्याचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
याशिवाय मंदिरातील ‘अग्नीशमन यंत्रणा, विद्युतीकरण या कामांची ‘ई-निविदा’ अंतिम झाली असून त्याचे कामसुद्धा आषाढीपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन करणे इत्यादी निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.