पहिल्या बाजीरावांनी मोगल आणि निजाम यांच्या विरोधात आचरलेली छत्रपती शिवरायांची युद्धनीती !

‘शिवराज्याभिषेक आणि हिंदुसाम्राज्य विस्तार’ यांविषयी प्रसिद्ध होणारी लेखमाला !

१. पहिले बाजीराव यांनी हिंदवी स्वराज्याविषयी व्यक्त केलेले विचार आणि छत्रपती शाहू महाराज यांनी दिलेला आशीर्वाद !

आपल्या पुरतेच पहाण्याच्या संकुचित प्रांतीय दृष्टीने हिंदु जातीचा राजकीय आणि धार्मिक विनाश केला. ही गोष्ट नादिरशहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले, त्या वेळी पहिल्या बाजीरावांनी सर्व हिंदु राजांना समजावली. स्वतःच्या राष्ट्रीय जीवनाच्या आध्यात्मिक आणि मानसिक उन्नतीसाठी नव्हे, तर प्रत्यक्ष वैयक्तिक हितासाठी स्वतःच्या राजकीय स्वातंत्र्याच्या आकांक्षा न्याय्य मर्यादेला नेऊन पोचेपर्यंत अन् अखिल हिंदु जातीला एकत्र, संघटित, तसेच जवळ करणारे थोर आणि समर्थ साम्राज्य प्रस्थापित होईपर्यंत त्यांनी विसावा न घेणे अन् रणांगणातून निघून न जाणे, हे नितांत आवश्यक आहे.

थोरले बाजीराव पेशवे ‘स्वराज्य साम्राज्यक’ !

महाराष्ट्रातील सामान्य शिपायालासुद्धा आता कळून चुकले होते, ते म्हणजे देहलीचे राज्य जोपर्यंत हिंदूंच्या हातात येत नाही, तोपर्यंत सातार्‍याला आपल्याला राज्य करता येणार नाही. म्हणूनच छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ज्या वेळी संपूर्ण मराठी मंडळाचे पुढारी महत्त्वाच्या प्रश्नाचा निर्णय घेण्यासाठी एकत्र आले, त्या वेळी पहिले बाजीराव उठले आणि त्यांनी हिंदूंची दृढमूल झालेली भावना अन् आकांक्षा व्यक्त केली. स्वतःचा उत्साह आणि अंगीकृत कार्याचे दिव्यत्व यांच्या प्रयत्नाने ते म्हणाले, ‘देहलीवर थेट आपण चाल करून जाऊ आणि मुसलमानी सत्तेच्या मुळावर सरळ घाव घालू. येथेच अनुमान करत आणि अडखळत का बसला आहात ? मी माझ्या तलवारीने त्यांच्याशी सामना करण्यासाठी सिद्ध आहे. त्यांच्या बळाची मला पूर्ण कल्पना आहे. छत्रपती महाराज मला आपल्यापासून पैसा किंवा माणसे काहीही नको. केवळ आपली अनुज्ञा आणि आशीर्वाद असू द्या. मी आताच इथून निघतो आणि आज जीर्ण विषारी वृक्षाला शाखा अन् मुळे यांच्यासह एकदम खाली आणतो.’ पहिल्या बाजीरावांच्या मनात हे विचार आले आणि त्यांनी ते तसे व्यक्त केले; कारण छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासस्वामी यांनी दिलेली शिकवण अन् सांगितलेला मार्ग नंतरच्या पिढीतील वीर योद्धे विसरले नव्हते.

छत्रपती शाहू महाराज यांनी पहिल्या बाजीरावांना ‘यशस्वी भव’, असा आशीर्वाद देतांना म्हटले, ‘तुम्ही माझ्या लोकांचे खरे पुढारी आहात. तुम्हाला वाटेल त्या दिशेने तुम्ही कूच करा. माझ्या सैन्याकडून विजयावर विजय संपादन करा. केवळ देहलीच काय घेऊन बसलात, आपला पवित्र भगवा झेंडा प्रत्यक्ष हिमालयाच्या मस्तकावर आणि त्याच्याही पलीकडे थेट सीमा प्रांतात नेऊन फडकवा.’ छत्रपती शाहू महाराज यांनी ज्या भगव्या ध्वजाचा उल्लेख केला, तो भगवा ध्वज समर्थ रामदासस्वामी यांनी दिला. छत्रपती शिवरायांनी याच ध्वजाखाली युद्ध करून त्याची सह्याद्रीच्या शिखरावर स्थापना केली. तोच ध्वज सीमा प्रांतावर नेऊन फडकवण्याचा निश्चय छत्रपती शाहू महाराज यांनी केला. (संदर्भ : ‘हिंदुपदपादशाही’, समग्र सावरकर, खंड तिसरा)

श्री. दुर्गेश परुळकर

२. छत्रपती शिवरायांची युद्धनीती बाजीरावांनी प्रत्यक्ष कृतीत आणून निजाम आणि मोगल यांच्याकडून युद्धवसुली करवून घेणे

उत्तरेवर स्वारी करण्यासाठी बाजीराव सज्ज होते. त्या वेळी इतरांनी अनेक शंका निर्माण केल्या. त्यांच्या शंकांचे निरसन करतांना बाजीराव म्हणाले, ‘छत्रपती शिवरायांनी प्रयत्नाची पराकाष्ठा करून दक्षिणेत हिंदु स्वातंत्र्याचे युद्ध चालू ठेवले. शिवरायांच्या काळात परिस्थिती अत्यंत प्रतिकूल होती, तरीसुद्धा त्यांनी हिंदु स्वातंत्र्याचे युद्ध शेवटच्या क्षणापर्यंत चालू ठेवले. सांप्रतकाळात अनुकूल परिस्थितीचा लाभ उठवला नाही, तर आपल्याला शिवरायांचे स्वप्न पूर्ण करता येणार नाही.’ बाजीरावांनी सहकार्‍यांच्या मनात मोगल सेनापतीच्या विरुद्ध लढण्याची इच्छा निर्माण केली. छत्रपती शिवरायांसारख्या अद्वितीय लोकनायकाच्या राष्ट्रीय धोरणाचा आणि विशिष्ट युद्ध पद्धतीचा बाजीरावांनी अभ्यास केला होता. हे आपल्या दृष्टोत्पत्तीला येते. त्या काळचे सर्व मुसलमानी सेनापती आणि राजकारणपटू यांमध्ये निजाम हा अधिक कर्तृत्ववान होता. तरीसुद्धा त्याला नमवून त्याचा विरोध नाहीसा करायचा, हे काम पहिल्या बाजीरावांनी हाती घेतले. त्यांनी छत्रपती शिवरायांची युद्धनीती कशी प्रत्यक्ष कृतीत आणली, हे मराठ्यांच्या युद्धपद्धतीचे अभूतपूर्व उदाहरण आहे.

७ ऑगस्ट १७२७ या दिवशी मुसळधार पाऊस पडत होता. या पावसातच बाजीरावांनी औरंगाबाद (संभाजीनगर) प्रांतात सैन्यासह प्रवेश केला. निजामाच्या अधिकाराखाली जालना आणि त्याच्या अवतीभवतीच्या प्रदेशातून त्यांनी युद्धाची खंडणी वसूल केली. त्या वेळी इवाजखानाच्या हाताखाली असलेले निजामाचे सैन्य बाजीरावाशी युद्ध करण्यासाठी पुढे आले. ते सैन्य पुढे येताच बाजीरावाने अचानक शत्रूला मागे टाकून माहूरच्या मार्गाने औरंगाबाद गाठले. तिथूनही खंडणी गोळा करणार, असे घोषित केले. ही गोष्ट निजामाला कळताच श्रीमंत नगरीचे रक्षण करण्यासाठी निजाम इवाजखानाच्या साहाय्यासाठी निघाला. ‘आपण आपला डाव पूर्णपणे साधला आणि निजाम फसला’, हे पाहिल्यावर बाजीरावाने इवाजखानाला सोडून दिले आणि ते गुजरातला गेले. तेथील मोगल सुभेदाराला त्याने सांगितले की, निजामाच्या सांगण्यावरून तो त्यांच्या प्रांतावर आक्रमण करण्यासाठी आला आहे. इकडे निजाम घाईघाईने औरंगाबादला आला. त्या वेळी त्याला कळले की, ज्या शत्रूपासून आपण आपल्या नगरीचे संरक्षण करण्यासाठी आलो, तो शत्रू गुजरातला निघून गेला आहे. त्यामुळे निजाम संतापला. त्याने बाजीरावाला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे तो पुण्यावर चालून जाण्यासाठी सिद्ध झाला. तोपर्यंत बाजीरावाने गुजरात सोडून पुन्हा वेगाने निजामाच्या राज्यात प्रवेश केला. निजाम पुण्याची लूट करण्यासाठी निघाला. ‘आपण शत्रूवर त्याचाच डाव उलटवला’, असे त्याला वाटले. तोपर्यंत बाजीरावाने त्यांचा प्रांत लुटून नेल्याची वार्ता त्याच्यापर्यंत पोचली. त्यामुळे पुण्याला पोचण्याआधीच त्याला त्याचे नियोजन पालटून माघारी परतावे लागले.

(क्रमश: पुढच्या बुधवारी)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.


निजामाकडून शाहू महाराजांना ‘महाराष्ट्राचे छत्रपती’ म्हणून मान्यता आणि कर चुकते करण्याचा करार

गोदावरीच्या काठावर बाजीराव आणि निजाम यांची गाठ पडली. निजामाशी लढाई टाळण्याची इच्छा असली, तरी बाजीरावाला युद्धासाठी हीच संधी हवी होती. पूर्वीप्रमाणे शत्रूला तोंड न देता, निसटून न जाता त्याने अत्यंत चातुर्याने हालचाली केल्या. मोगलांना आपल्या इच्छेप्रमाणे मालखेडजवळ येण्यास भाग पाडले. अत्यंत कौशल्याने युद्धाला तोंड देण्याचे त्याने टाळले. तितक्याच कौशल्याने त्याने आक्रमक युद्धाला आरंभ केला. लांब अंतराच्या बंदुका, जड तोफा असूनसुद्धा निजामाची पुरी कोंडी केली. पाठीशी लागलेल्या मराठी सैन्याच्या तावडीतून सुटणे अशक्य आहे, हे निजामाला कळून चुकले. ‘आपल्या सैन्याचा पूर्ण नाश तरी होईल, नाही तर बाजीराव जी आज्ञा करतील, ती गोष्ट मुकाट्याने आपल्याला मान्य करावी लागेल’, असा प्रसंग निजामावर आला. त्याने शाहू महाराजांना ‘महाराष्ट्राचे छत्रपती’ म्हणून मान्यता दिली. चौथाई, सरदेशमुखी यांचे सर्व येणे चुकते करून देण्याचा करार केला. (चौथाई आणि सरदेशमुखी, म्हणजे या दोन्ही मुख्यतः छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर; पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करत. चौथाई दौलतीकडे, म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होई, तर सरदेशमुखीचा वसूल छत्रपतींच्या खासगी उत्पन्नाची गोष्ट होती.) आपल्या प्रांतातील कर गोळा करणार्‍या सर्व मराठी अधिकार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे वचन दिले.

– श्री. दुर्गेश परुळकर