Namaz on Road In Sanand (Gujarat) : ३ मजली मशीद असून रस्त्यावर नमाजपठण : गुजरातमधील सानंद उपनगरातील व्यावसायिकांची  प्रशासनाकडे तक्रार !

सानंदमधील हिंदु नेत्यांचे पोलीसांना निवेदन

कर्णावती (गुजरात) – गुजरातमधील कर्णावतीच्या उपनगरातील सानंद येथे मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करत असल्याने स्थानिक लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. येथील मशीद ३ मजली उंच आहे, तरीही प्रत्येक शुक्रवारी मुसलमान रस्त्यावर नमाजपठण करतात. रस्ता अडवला जात असल्याने त्रस्त झालेल्या सानंद येथील व्यावसायिकांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ही समस्या सोडवली नाही, तर आंदोलन करू, अशी चेतावणी स्थानिक लोकांनी दिली आहे.

१. ८ मार्च २०२५ या दिवशी  सानंदमधील हिंदु नेत्यांनी स्थानिक प्रशासन आणि पोलीस विभाग यांना निवेदन सादर करून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. व्यापार्‍यांचे म्हणणे आहे की, ही समस्या त्वरित सोडवली पाहिजे; कारण त्याचा त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे.

२. सानंदमधील डाक चौकाजवळ एक ३ मजली उंच मशीद आहे, ज्याच्या बाहेरचा रस्ता प्रत्येक शुक्रवारी बंद असतो. या काळात रस्त्यावरच नमाजपठण केले जाते. त्यामुळे व्यापारी, पादचारी आणि सामान्य नागरिक यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. निवेदनात म्हटले आहे की, मशिदीमध्ये भरपूर जागा आहे. असे असूनही, सामान्य लोकांना त्रास देण्यासाठी रस्त्यावर नमाजपठण केले जात आहे.

३. सानंद शहर भाजपचे माजी अध्यक्ष कमलेश व्यास यांनी सांगितले की, सार्वजनिक रस्त्यावर बर्‍याच काळापासून नमाजपठण केले जात आहे. या काळात रस्ता दोन तास बंद असतो. त्यामुळे दळणवळण थांबते आणि तेथील व्यवसायही ठप्प होतो.

कमलेश व्यास म्हणाले, ‘‘आमचा नमाजपठण करण्यावर किंवा कोणत्याही धर्मावर आक्षेप नाही; परंतु सार्वजनिक रस्ते अडवून नमाजपठण केल्याने सामान्य लोकांना त्रास होत आहे.’’

संपादकीय भूमिका

अशी तक्रार का करावी लागते ? प्रशासन आणि पोलीस यांना हे दिसत नाही का ?