पणजी, १० मार्च (वार्ता.) – काही पालक आणि पालक-शिक्षक संघ यांचा विरोध डावलून शिक्षण खात्याने इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष (वर्ष २०२५-२६) १ एप्रिल २०२५ पासून प्रारंभ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. एरव्ही हे शैक्षणिक वर्ष जून मासाच्या पहिल्या आठवड्यात प्रारंभ होत असे. शिक्षण खात्याच्या या निर्णयाला काही लोकांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठात आव्हान दिले आहे. शिक्षण खात्याने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. गोवा खंडपिठात १० मार्च या दिवशी या प्रकरणी सुनावणी झाली. न्यायालयाने गोवा सरकार आणि केंद्रीय शिक्षण खाते यांना उत्तर देण्यासाठी वेळ दिला असून पुढील सुनावणी १९ मार्च या दिवशी ठेवली आहे.
शिक्षण खात्याने १ एप्रिल २०२५ पासून इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंतचे वर्ग सकाळी ११.३० वाजेपर्यंत चालवण्याचे ठरवले आहे. यानंतर विद्यार्थ्यांना १ मे ते ३ जूनपर्यंत उन्हाळ्याची सुटी असणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्याचाच हा एक भाग आहे. न्यायालयातील याचिकेविषयी बोलतांना राज्याचे महाधिवक्ता देवीदास पांगम म्हणाले, ‘‘गोवा सरकारने शिक्षणतज्ञ, शिक्षक आदींचा सल्ला घेऊन विद्यार्थ्यांच्या हितासाठीच १ एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष चालू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि ही सर्व सूत्रे गोवा खंडपिठासमोर मांडण्यात येणार आहेत.’’