तेल अवीव – इस्रायलने गाझाला वीजपुरवठा खंडित करण्याची घोषणा केली. ही घोषणा कधीपासून लागू होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या निर्णयाचा परिणाम गाझामधील पिण्याच्या पाण्याच्या उत्पादन प्रकल्पांवर होऊ शकतो; कारण या प्रकल्पांना वीजपुरवठा केवळ इस्रायलकडूनच केला जातो. इस्रायलने एका आठवड्यापूर्वीच गाझामधील २० लाखांहून अधिक लोकांना सर्व वस्तूंचा पुरवठा थांबवला होता. गेल्या आठवड्यात संपलेल्या युद्धबंदीच्या पहिल्या टप्प्याचा कालावधी वाढवण्यासाठी हमासवर दबाव आणण्याचा इस्रायलचा उद्देश आहे. त्याचवेळी हमास युद्धबंदीच्या चर्चेचा दुसरा टप्पा चालू करण्यासाठी दबाव आणत आहे, जो अधिक गुंतागुंतीचा आहे.
इस्रायली सैन्याने पहिल्यांदाच ‘बफर झोन’मधून माघार घेतली आहे. युद्ध चालू झाल्यानंतर पहिल्यांदाच सहस्रो विस्थापित पॅलेस्टिनी उत्तर गाझामध्ये परतले आहेत. इस्रायलने वस्तूंचा पुरवठा खंडित करेपर्यंत प्रतिदिन शेकडो ट्रक साहाय्य गाझाला पाठवले जात होते. इस्रायल-हमास युद्धात आतापर्यंत १ सहस्र २०० हून अधिक इस्रायली आणि ४५ सहस्रांहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.