|
नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या वतीने (एन्.एम्.एम्.टी.) महिलांसाठीची तेजस्विनी बससुविधा वर्षभरापासून बंद पडली आहे. ही बस सेवा पुन्हा चालू करावी, अशी मागणी महिला करत आहेत.
‘एन्.एम्.एम्.टी.’च्या माध्यमातून वर्ष २०१८ पासून महिलांसाठी विशेष ‘तेजस्विनी’ बस सुविधा चालू करण्यात आली होती. केवळ २ वर्षे या १० बस मार्गावर योग्य प्रकारे चालल्या. त्यानंतर पुढील २ वर्षांत टप्प्याटप्प्याने बस बंद पडत गेल्या. गेल्या १ वर्षापासून या बस महिलांच्या सेवेतून बाद झाल्या आहेत.
कोणत्याही बसची आयुर्मर्यादा १५ वर्षे इतकी असते; परंतु योग्य देखभाल-दुरुस्तीच्या अभावामुळे काही वर्षांतच अशी स्थिती निर्माण झाली आहे. या बस नामांकित आस्थापनाच्या असतांनाही त्या नादुरुस्त झाल्यास त्यांचे (सुट्टे भाग) स्पेअर पार्ट वेळेत उपलब्ध न होणे आणि अन्य कारणांमुळे बस या आगारामध्ये विनाकारण उभ्या ठेवाव्या लागत आहेत. त्यामुळे त्या सडत आहेत.
महिलांसाठीच्या तेजस्विनी बसगाड्या चालू करण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली आहे; पण प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे सामाजिक कार्यकर्ते निलेश कचरे यांनी सांगितले.