देशभरातील सरकारीकरण झालेली मंदिरे सरकारमुक्त करण्याची मंदिर महासंघाची मागणी

अमरावती (वार्ता.) – अमरावतीसह विदर्भातील अनेक सार्वजनिक मंदिर ट्रस्टच्या भूमी काही महसूल अधिकारी, बिल्डर लॉबी यांच्याशी संगनमत करून हडपण्यात आलेल्या आहेत. या विरोधात महाराष्ट्र शासनाने तात्काळ ‘अँटी लँड ग्रॅबिंग’ (भूमी चोरी प्रतिबंध) कायदा करावा. ज्यांनी मंदिरांच्या भूमी बळकावल्या, त्या मुक्त करून मंदिरांच्या कह्यात द्याव्यात. मंदिरांचे पावित्र्य राखणे हे आपले कर्तव्य आहे. कुठल्याही अहिंदूंच्या कृतीमुळे मंदिरातील पावित्र्य नष्ट होत असल्याचे वाटत असेल, तर अयोग्य गोष्टींना प्रतिबंध करावा, अशी मागणी यांनी केली. या मागणीसह मंदिर सुरक्षा, मंदिर समन्वय, मंदिर धर्मप्रचाराचे केंद्र व्हावे, तसेच युवा संघटन या विषयांवरील मागण्यांसाठी महाराष्ट्र मंदिर न्यास अधिवेशन पार पडले. अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अधिवेशनामध्ये मठ-मंदिराचे विश्वस्त, पुजारी, प्रतिनिधी असे ४५० हून अधिक जण उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.
अधिवेशनाचे आयोजन महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने श्री महारुद्र हनुमान मंदिर, जहागीरपूर येथे करण्यात आले होते. अधिवेशनाचे सहआयोजक म्हणून श्री महारुद्र हनुमान मंदिर, जहागीरपूर; श्री पिंगळादेवी संस्थान, नेरपिंगळाई; श्री नागेश्वर महादेव संस्थान, धामंत्री; देवस्थान सेवा समिती, विदर्भ आणि हिंदु जनजागृती समिती सहभागी झाले होते.
या वेळी व्यासपिठावर महारुद्र मारुति देवस्थानाचे अध्यक्ष श्री. ओम प्रकाश परतानी, महंत श्री पंचदशनाम आखाडा कैलास आश्रम वरुडचे पू. वसुदेवनंद गिरी महाराज, पू. श्री जनार्दन पंत बोथे – अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रीय सरचिटणीस, सनातन संस्थेचे धर्मप्रसारक पू. अशोक पात्रीकर, पू. जयगिरी महाराज, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक श्री. सुनील घनवट, श्री. संदीप दौंडकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून अधिवेशनाचा प्रारंभ करण्यात आला.
मंदिर महासंघाला ‘अधिकृत संघटना’ म्हणून घोषित करण्याची मागणी !
‘मंदिरे ही सनातन धर्मप्रचाराचे केंद्र होणे आवश्यक असून यासाठी १५ सहस्र मंदिरांचे संघटन झालेले आहे. या संघटनाच्या माध्यमातून मंदिरांच्या समस्या सोडवणे आणि मंदिर महासंघाला ‘अधिकृत संघटना’ म्हणून घोषित करावे, ही मागणी शासनाकडे करण्यात येत आहे’, असेही श्री. सुनील घनवट म्हणाले.
महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेत सर्वानुमते पारित करण्यात आलेले ठराव१. मंदिरांचे व्यवस्थापन सरकारने मुक्त करावे. २. मंदिरांची संपत्ती विकासासाठी वापरण्यास प्रतिबंध असावा. ३. धर्मदाय आयुक्त कार्यालयाची नियमबाह्य पत्रे थांबवावीत. ४. पौराणिक मंदिरांचा जीर्णोद्धार करण्यासाठी निधी द्यावा. ५. इस्लामी अतिक्रमणे हटवावीत. ६. ‘क’वर्गातील मंदिरे ‘ब’वर्गात वर्गीकरण करावीत. ७. मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे यांमध्ये मद्य-मांस विक्रीला विरोध करावा. ८. पुजार्यांना मानधन देण्याची व्यवस्था करावी. |
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत सर्वानुमते करण्यात आलेले संकल्प !१. मंदिरांच्या व्यापक हितासाठी संघटितपणे कार्य करू. २. मंदिरांचा वाद सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न करू. ३. मंदिरांचे सरकारीकरण रोखण्यासाठी संघर्ष करू. ४. मंदिरांच्या प्रथा-परंपरा शास्त्रीय पद्धतीने होतील, शासकीय हस्तक्षेप अमान्य करू. |
विश्वस्तांनी मंदिराचे कार्य प्रामाणिकपणे करावे ! – ओमप्रकाश परताणी, अध्यक्ष, श्री महारुद्र मारुति संस्थान, जहागिरपूर
ज्याच्या हातून मंदिर जीर्णोद्धाराचे कार्य निःस्वार्थ भावाने आणि मनोभावे होते, त्यांना मोक्षप्राप्ती होते, तरी सर्व विश्वस्तांनी मंदिराचे कार्य प्रामाणिकपणे करावे. महाराष्ट्र मंदिर समितीचे कार्य निःस्वार्थपणे चालू असल्याने आम्ही त्यांना सहकार्य करण्यासाठी कटिबद्ध आहोत.
मंदिरांचा धर्मकार्यातील सहभाग दिवसेंदिवस वाढवावा लागेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था
मंदिरे, धर्मकार्य, धर्मशास्त्र आणि अध्यात्म यांची सांगड घालणारे आदर्श उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ! देशातील मंदिरांचे व्यवस्थापन आणि त्या मंदिरांचा धर्मकार्यात असलेला सहभाग दिवसेंदिवस वाढवावा लागणार आहे. त्याच उद्देशाने मंदिर न्यास अधिवेशन घेण्यात येत असून यात प्रत्येकाने सक्रियपणे सहभागी व्हावे.
न्यूनगंड न बाळगता धर्मकार्य करा ! – पू. श्री जनार्दन बोथे गुरुजी, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाचे राष्ट्रीय सचिव
‘जागो । अपने धर्म को जगावो ।’ असे भजन आहे. आपणही याप्रमाणे धर्मकार्य करावे. आज ‘मी हिंदु आहे’, अशी स्वतःची ओळख करून देण्याची आपल्याला लाज वाटते. धर्माकडे दुर्लक्ष झाल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. आज आपल्या धर्मात ‘विश्वगुरु’ बनण्याचे सामर्थ्य आहे. त्यामुळे न्यूनगंड न बाळगता धर्मकार्य करा.
हिंदु धर्म, गोमाता, मंदिर आणि राष्ट्र यांच्या रक्षणाचा संकल्प करा ! – संदीप दौंडकर, उपाध्यक्ष, रांजणगाव गणपति मंदिर
देवदर्शनासाठी येणारा कुणीही ‘व्हीआयपी’ नसून येणारा प्रत्येक भाविक समान आहे. या तत्त्वानुसार आम्ही आमच्या मंदिरात ‘व्हीआयपी’ दर्शन पद्धत बंद केली. छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदान मास आणि मंदिर अधिवेशन येथे पार पडत आहे, हे आपल्या सर्वांचे परमभाग्य आहे; म्हणूनच महाराजांचा आदर्श समोर ठेवून सर्वांनी एकत्रितरित्या काम करून हिंदु धर्म, गोमाता, मंदिर, आणि राष्ट्र यांचे संरक्षण करण्याचा संकल्प करा.
धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत प्रत्येक मंदिर येत असल्याने मंदिराचे अहवाल ठेवणे, न्यास बनवणे, पालट अहवाल, मंदिराच्या कायदेविषयक अडचणी, तसेच भूमी कायदे इत्यादी अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर मुंबई येथील अधिवक्त्या (सौ.) स्वाती दीक्षित यांनी उद्बोधन आणि शंकानिरसन केले.
महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी श्री. अनुप जयस्वाल यांनी अनुभवकथन केले. ते म्हणाले, ‘‘अमरावती येथील सोमेश्वर मंदिर आणि तेल्हारा येथील बालाजी मंदिर यांसह इतर मंदिरांच्या भूमीविषयीची प्रकरणे महाराष्ट्र मंदिर महासंघ यशस्वीपणे हाताळत आहे. आजपर्यंत १ सहस्र ५०० हून अधिक एकर भूमी मंिदरांना परत मिळवून दिली आहे. यापुढेही हा लढा असाच चालू राहील. यामध्ये मंदिर विश्वस्तांनी सक्रियपणे सहभागी व्हावे.’’ या वेळी श्री नागेश्वर महादेव संस्थान, धामंत्रीचे अध्यक्ष श्री. कैलास पनपालिया यांनी उपस्थितांना मंदिरांचा विकास आराखडा विकास निधी कसा प्राप्त करायचा ? आणि मंदिरांना तीर्थक्षेत्र दर्जा मिळवण्यासाठी काय आणि कसे प्रयत्न करावेत ? यासाठी सविस्तर मार्गदर्शन केले. हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर यांनी उपस्थितांना धर्मशिक्षणाची आवश्यकता विषद करून मंदिरांच्या माध्यमातून धर्मशिक्षण योग्य प्रकारे समाजापर्यंत पोचवावे, असे आवाहन केले. मंदिर महासंघाचे अमरावती जिल्हा संयोजक श्री. नीलेश टवलारे यांनी मंदिराच्या माध्यमातून युवा संघटन, मंदिर सुरक्षा, सामूहिक आरती आदी उपक्रम यशस्वी करण्याचे उपाय सांगितले. वरूड येथील श्री पंचदशनाम आखाडा कैलास आश्रमाचे महंत वासुदेवानंद महाराज यांनी अधिवेशनामध्ये मंदिरांशी निगडीत आवश्यक सूत्रांवर विचारमंथन केले, तसेच सर्वानुमते ठराव पारित करण्यात आले. |