खासदार संजय राऊत आणि आमदार रोहित पवार यांच्या विरोधात मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून हक्कभंग !

मुंबई, ६ मार्च (वार्ता.) – माध्यमांमध्ये अपकीर्ती केल्याच्या कारणावरून ६ मार्च या दिवशी विधानसभेत ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी खासदार संजय राऊत, शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आणि ‘लय भारी’ यू ट्यूब वाहिनीचे संपादक तुषार खरात यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव स्वीकारून निर्णयासाठी विधीमंडळाच्या हक्कभंग समितीकडे पाठवला आहे.

‘संजय राऊत आणि रोहित पवार यांनी प्रसिद्धीमाध्यमांपुढे माझी अपकीर्ती केली, तर ‘लय भारी’ यू ट्यूब वाहिनीवरून सातत्याने माझी अपकीर्ती करणारे व्हिडिओ प्रसारित करण्यात आले. पत्रकारितेमध्ये टीका करतांना भाषेचा स्तर राखला पाहिजे. ‘लय भारी’ यू ट्यूब चॅनेलवरून तो राखला गेला नाही. त्यामुळे हक्कभंग आणत असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात म्हटले.

काय आहे प्रकरण ?

एका महिलेला नग्न अवस्थेतील फोटो पाठवल्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्या विरोधात वर्ष २०१७ मध्ये गुन्हा नोंद झाला होता. या प्रकरणी वर्ष २०१९ मध्ये न्यायालयाने जयकुमार गोरे यांची निर्दाेष मुक्तता केली.

याविषयी जयकुमार गोरे म्हणाले, ‘‘न्यायालयाने माझा भ्रमणभाष आणि अन्य पुरावे पडताळून निकाल दिला. लोकशाहीत न्यायालय सर्वोच्च असल्यामुळे या विषयावर पुन्हा चर्चा होणे चुकीचे आहे. माझ्यावर झालेले आरोप खोटे आहेत. या प्रकरणी मी अब्रूहानीचा खटलाही नोंदवणार आहे. मी जर महिलेचा छळ केला असेल, तर पोलिसांनी अन्वेषण करावे. मी दोषी आढळल्यास कठोर कारवाई व्हावी.’’