साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधातील सर्व तक्रारी फातोर्डा पोलीस ठाण्यात वर्ग : अन्वेषणाला प्रारंभ

छत्रपती शिवाजी महाराज यांचा कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी अवमान केल्याचे प्रकरण

कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे

मडगाव, ६ मार्च (वार्ता.) – कोकणी साहित्यिक उदय भेंब्रे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे विधान केले होते. यानंतर साहित्यिक उदय भेंब्रे यांच्या विरोधात गोवा राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अनेक तक्रारी प्रविष्ट (दाखल) झालेल्या आहेत. या सर्व तक्रारी फातोर्डा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. या तक्रारींवर अन्वेषण चालू झाले आहे. फातोर्डा पोलीस ठाण्यात साहित्यिक उदय भेंब्रे यांनीही बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे आणि या तक्रारीचेही अन्वेषण फातोर्डा पोलीस करत आहेत.
फातोर्डा पोलीस ठाण्याचे निरीक्षक नॅथन आल्मेदा म्हणाले, ‘‘पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी आणि अन्य यांची साक्ष नोंदवून घेतली आहे. तक्रारींचे अन्वेषण चालू आहे.’’

उदय भेंब्रे यांच्या विरोधात आज वाळपई येथे निषेध सभा

वाळपई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान करून वाद निर्माण केल्याच्या पार्श्वभूमीवर सत्तरी तालुक्यातील शिवप्रेमी आणि समविचारी नागरिक यांच्याकडून आज, ७ मार्च या दिवशी सायंकाळी ४.३० वाजता निषेध सभेचे आयाेजन करण्यात आले आहे. ही सभा
वाळपई येथील छत्रपती शिवाजी महाराज पालिका उद्यानात आयोजित करण्यात आली आहे. ‘उदय भेंब्रे यांनी चुकीची विधाने करून शिवप्रेमी आणि अन्य नागरिक यांच्यामध्ये संभ्रमित अवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या विधानामुळे गोव्यात वादाचे वातावरण निर्माण झाले आहे. उदय भेंब्रे यांचा निषेध करण्यासाठी ही सभा होणार आहे. या सभेला शिवप्रेमींनी उपस्थित रहावे, असे आवाहन अधिवक्ता यशवंत गावस यांनी केले आहे.