यवतमाळ जिल्ह्यातील बसस्थानकांमध्ये प्रतिदिन चोरी !

यवतमाळ बसस्थानक

यवतमाळ, ६ मार्च (वार्ता.) – जिल्ह्यातील ९ बसस्थानकाच्या आगारांमध्ये प्रतिदिन खिसा कापणे, भ्रमणभाषची, तसेच दागिने यांची चोरी होणे या घटना घडत आहेत. येथे १८ सुरक्षारक्षकांची पदे संमत केलेली आहेत; मात्र ९ जणांना कामचुकार वृत्तीने कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे ८ बसस्थानकांत सुरक्षारक्षकच नाही. प्रतिआगारानुसार पोलीस चौकी संमत करण्यात आलेली आहे; मात्र तरीही केवळ यवतमाळ आणि पुसद येथेच पोलीस चौकी आहे. तेथील सुरक्षारक्षक भ्रमणभाषमध्ये खेळ खेळण्यात व्यस्त असतात. मध्यंतरी यवतमाळ पोलीस चौकीत एका दारुड्याने पार्सल विभागातील संगणकाची तोडफोड केली होती. या वर्षात जिल्ह्यातील बसस्थानकांमधून चोरांनी ४१ लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी केली. (सुरक्षारक्षकांची पदे आणि पोलीस चौक्यांची मान्यता असतांनाही त्यांची पूर्तता न करता प्रवाशांना वार्‍यावर सोडणारी प्रशासनव्यवस्था काय कामाची ? – संपादक)