राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांचे स्पष्टीकरण

मुंबई – माझ्या एका विधानामुळे अपसमज निर्माण झाला आहे. मुंबईची भाषा मराठी आहे, याविषयी कोणतेही दुमत नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मुंबई महाराष्ट्रात आहे आणि स्वाभाविकच मुंबईची भाषा मराठी आहे. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. मुंबईतही विविध भाषा बोलणारे लोक रहातात. त्यामुळे त्यांनीही येथे यावे आणि मराठी शिकावे, मराठी समजून घ्यावे आणि मराठी वाचावे, ही स्वाभाविक अपेक्षा आहे. माझी मातृभाषा मराठी आहे; पण मी सर्व भाषांच्या अस्तित्वाचाही आदर करतो. सर्वांना याच दृष्टीने पहाण्याची विनंती करतो, असे स्पष्टीकरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य भैय्याजी जोशी यांनी दिले. मराठी भाषेविषयी केलेल्या विधानानंतर सर्वच बाजूंनी झालेल्या टीकेनंतर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.