
चुनाभट्टी (मुंबई) – छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदु धर्माच्या रक्षणासाठी आपल्या देहाचा प्रत्येक अवयव आणि रक्ताच्या एक एक थेंबाचा त्याग केला होता. या हिंदु धर्मासाठी आपण प्राण नाही; पण १ घंटा निश्चित देऊ शकतो, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. हेमंत पुजारे यांनी येथे केले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चुनाभट्टी येथे बलीदानमास पाळण्यात आला. येथील मानवसेवा प्रतिष्ठान, पावनखिंड दौड समिती आणि गावकरी मंडळ यांच्या एकत्रीकरणातून याचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्त १ मार्च या दिवशी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. या वेळी ८५ ते ९० राष्ट्रप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभाग घेतला. ‘मानव सेवा प्रतिष्ठान’चे संस्थापक अध्यक्ष श्री. विनायक शिंदे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या श्री सिद्धिविनायक भाग कार्यकारिणी सदस्य श्री. संतोष मौर्य, भारतीय जीवन विमा निगमचे अधिकारी श्री. सचिन निरकर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मुग्धा पालांडे यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन झाले. ‘छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन असामान्य शौर्य, त्याग आणि धर्माप्रती निष्ठा यांनी ओतप्रोत भरलेले आहे. सतत ४० दिवस मरणासन्न यातना भोगूनही धर्माप्रती निष्ठा ठेवून प्राणाचे बलीदान देणारे संभाजी महाराज यांच्या चरित्राचे नागरिकांमध्ये बीजारोपण करण्यासाठी बलीदानमासाचे आयोजन करण्यात येते. यातून राष्ट्र-धर्माप्रती निष्ठावान समाज निर्माण होईल’, असे आयोजकांनी सांगितले.