३ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘संत ज्ञानदेव यांनी ‘ज्ञानेश्वरी’साठी मराठीचे माध्यम निवडण्यामागील कारण आणि संत ज्ञानदेव यांनी दर्शवलेला मराठी भाषेविषयीचा अभिमान, तिच्या सामर्थ्याचा प्रत्यय अन् दर्शवलेली कल्पकता’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/889313.html

३. मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य आहे, ते संतश्रेष्ठ ज्ञानदेवांनी दाखवणे !
६ व्या अध्यायातील संत ज्ञानदेव यांच्या निरूपणाने श्रोते सुखावले, त्यांनी योजलेल्या शब्दांतील सौंदर्य श्रोत्यांना जाणवले. त्यामुळे त्यांचे चांगलेच समाधान झाले. त्याची पावती श्रोते पुढीलप्रमाणे देतात –
हां हो नवल नोहे देशी । मर्हाटी बोलिजे तरी ऐशी ।
वाणें उमटताहे आकाशीं । साहित्य रंगाचे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १३३
अर्थ : अहो, देशीभाषारूपी आकाशात अलंकाररूपी रंगाचे निरनिराळे प्रकार स्पष्ट होत आहेत, अशी मराठी भाषा बोलता येते, हे आश्चर्य नव्हे का ?
कैसें उन्मेखचांदिणें तार । आणि भावार्थु पडे गार ।
हेचि श्लोकार्थ कुमुदिनी फार । साविया होती ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १३४
अर्थ : ज्ञानरूपी चांदणे कसे स्वच्छ आणि टपोर पडले आहे. पहा, त्या व्याख्यानातील निरनिराळे अभिप्राय हाच चांदण्यांचा गारवा आहे आणि श्लोकांचा अर्थ हीच कुणी चंद्रविकासी कमळे सहज विकसित होत आहेत.
येथे मराठी भाषेतील मानाला शुभ्र चांदण्याची उपमा दिली आहे. ती हेच दर्शवते की, मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य आहे; म्हणूनच त्या भाषेत रचना करून संत ज्ञानदेवांनी ज्ञानाचे हे दालन सामान्यजनांसाठी खुले केले.
४. मराठी भाषेच्या सौंदर्यामुळे इंद्रियांना सामर्थ्य आणि साधकांना सिद्धांत कळणे
मराठी भाषेचे सौंदर्य इतके अप्रतिम आहे की, त्यामुळे इंद्रिये तरतरीत होतात, त्यांना सामर्थ्य प्राप्त होते आणि साधकांना सिद्धांतांच्या ठावठिकाणी थेट पोचता येते. या सौंदर्याची तुलना संत ज्ञानदेवांनी ‘मालती’ पुष्पांशी केली आहे. प्रसंग असा आहे, ७ व्या अध्यायाच्या अखेरीस अर्जुनाचा प्रश्न आणि त्यावरील श्रीकृष्णाचे उत्तर पुढील, म्हणजे ८ व्या अध्यायातून मराठीत सांगितले जाईल, असे सुचवून ते मराठी भाषेचे सौंदर्य खालील ओव्यांत वर्णन करतात,
तिये अवधान द्यावें गोठी । बोलिजेल नीट मर्हाटी ।
जैसी कानाचे आधीं दिठी । उपेगा जाये ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ७, ओवी २०६
अर्थ : ते सरळ मराठी भाषेत सांगितले जाईल. त्या निरूपणाकडे लक्ष द्यावे. जसे कानाच्या आधी दृष्टीचा उपयोग होतो.
बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।
अक्षरांचिया भांबा । इंद्रिये जिती ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ७, ओवी २०७
अर्थ : त्याप्रमाणे बुद्धीच्या जिव्हेने शब्दाचा अर्थ न चाखता, केवळ अक्षरांच्या शोभेने इंद्रिये जगतील. (इंद्रियांचे समाधान होईल).
पहा पां मालतीचे कळे । घ्राणासि कीर वाटले परिमळें ।
परि वरचिला बरवा काइ डोळे । सुखिये नव्हती ? ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ७, ओवी २०८
अर्थ : अहो, असे पहा की, मालतीच्या कळ्या नाकाला खरोखर सुगंधाने बर्या वाटल्या; पण त्यांच्या वरच्या शोभेने डोळे सुखी होत नाहीत का ?
तैसें देशियेचिया हवावा । इंद्रियें करिती राणिवा ।
मग प्रमेयाचिया गांवा । लेसां जाइजो ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ७, ओवी २०९
अर्थ : त्याप्रमाणे मराठी भाषेच्या सौंदर्याने इंद्रिये राज्य करतील आणि मग प्रमेयाच्या (सिद्धांताच्या) गावाला त्यास चांगल्या सिद्धतेने जाता येईल.
ऐसेनि नागरपणें । बोलु निमे तें बोलणें ।
ऐका ज्ञानदेवो म्हणे । निवृत्तीचा ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ७, ओवी २१०
अर्थ : ‘जेथे शब्द नाहीसा होतो ते बोलणे, अशा सुंदर रितीने मी सांगीन, ते तुम्ही ऐका’, असे संत निवृत्तीनाथ यांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात.
५. संत ज्ञानदेवांनी मराठीच्या सौंदर्याचा केलेला हृद्य आविष्कार
१० व्या अध्यायाच्या प्रास्ताविकात आणि पहिल्या ९ अध्यायांत आलेल्या विषयांचे थोडक्यात समालोचन करून झाल्यावर ‘अत्यंत गहन असे गीतातत्त्व, सौंदर्याने नटलेल्या देशी भाषेचे कथन करण्यात येईल’, असे संत ज्ञानदेव सांगतात. मराठीच्या सौंदर्याचा संत ज्ञानदेवांनी येथे केलेला आविष्कार अतिशय हृद्य, असा झाला आहे. ते म्हणतात,
देशियेचेनि नागरपणें । शांतु शृंगारातें जिणें ।
तरि ओंविया होती लेणें । साहित्यासि ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ४२
अर्थ : मराठी भाषेच्या सुंदरपणाने शांतरस शृंगाररसाला जिंकील आणि ओव्या तर अलंकारशास्त्राला भूषण होतील.
मूळ ग्रंथींचिया संस्कृता । वरि मर्हाठी नीट पढतां ।
अभिप्राय मानलिया उचिता । कवण भूमी हें न चोजवे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ४३
अर्थ : मूळ संस्कृत गीताग्रंथावर माझी असणारी मराठी टीका जर चांगली वाचली आणि योग्य रितीने दोन्हींचा अभिप्राय जर चांगला पटला, तर कोणता मूळ ग्रंथ आहे, हे कळणार नाही.
जैसें अंगाचेनि सुंदरपणें । लेणिया आंगचि होय लेणें ।
तेथ अळंकारिलें कवण कवणें । हें निर्वचेना ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ४४
अर्थ : ज्याप्रमाणे शरिराच्या सौंदर्याने शरीर हेच अलंकारास भूषण होते, अशा स्थितीत कुणी कुणाला शोभा आणली, याची निवड होत नाही.
तैसी देशी आणि संस्कृत वाणी । एका भावार्थाच्या सुखासनीं ।
शोभती आयणी । चोखट आइका ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ४५
अर्थ : त्याचप्रमाणे माझी मराठी आणि संस्कृत भाषा या दोन्हीही एकाच अभिप्रायाच्या पालखीत शोभतात, त्या तुम्ही चांगल्या बुद्धीने ऐका.
उठावलिया भावा रूप । करितां रसवृत्तीचें लागे वडप ।
चातुर्य म्हणे हे पडप । जोडलें आम्हां ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ४६
अर्थ : गीतेचा पुढे आलेला अभिप्राय सांगत असता शृंगारादी नवरसांचा वर्षाव होतो आणि चातुर्य म्हणते, आम्हाला प्रतिष्ठा प्राप्त झाली.
तैसें देशियेचें लावण्य । हिरोनि आणिलें तारुण्य ।
मग रचिलें अगण्य । गीतातत्त्व ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १०, ओवी ४७
अर्थ : वरच्या ओवीत सांगितलेला परिणाम ज्याच्या योगाने होईल, तसे मराठी भाषेचे सौंदर्य घेऊन (नवरसांना) तारुण्य आणले आणि मग अमर्याद गीतातत्त्व रचले. (म्हणजे गीतेवर टीका केली.)
(क्रमशः)
(साभार : मासिक : ‘प्रसाद’, सप्टेंबर २००६)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/890247.html