३ आणि ४ मार्च या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखांत आपण ‘संत ज्ञानदेव यांनी ‘ज्ञानेश्वरी’साठी मराठीचे माध्यम निवडण्यामागील कारण, संत ज्ञानदेव यांनी दर्शवलेला मराठी भाषेविषयीचा अभिमान, मराठी भाषेत श्रेष्ठ असे ज्ञान देण्याचे सामर्थ्य आणि संत ज्ञानदेवांनी मराठीच्या सौंदर्याचा केलेला हृद्य आविष्कार’, यांविषयीचे लिखाण वाचले. आज या लेखाचा पुढील भाग येथे दिला आहे.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/889313.html

६. संत ज्ञानदेवांनी मराठी भाषा रसाळ, मधुर अन् सुलभ असल्याविषयी वर्णिलेल्या ओव्या
‘विश्वरूपदर्शन’ हा ११ व्या अध्यायाचा विषय आहे. या अध्यायाच्या नमनाच्या आरंभीलाच ‘मराठी भाषा कशी रसाळ आणि मधुर अन् तशीच सुलभ आहे’, याचा उल्लेख संत ज्ञानदेव खालील ओव्यांमध्ये करतात,
अहो वधुवरांचिये मिळणीं । जैशी वराडियां लुगडीं लेणीं ।
तैसे देशियेच्या सुखासनीं । मिरवले रस ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ११, ओवी ३
अर्थ : अहो, नवरा-नवरीच्या लग्नसमारंभात ज्याप्रमाणे वर्हाडी लोकांनाही वस्त्रे आणि दागिने मिळतात, त्याप्रमाणे अन्य रसांचीही मराठी भाषारूप पालखीत मिरवणूक होऊन त्यांना शोभा आली आहे.
परि शांताद्भुत बरवे । जे डोळियांच्या अंजुळीं घ्यावें ।
जैसे हरिहर प्रेमभावें । आले खेंवा ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ११, ओवी ४
अर्थ : परंतु शांत आणि अद्भुत हे २ चांगले रस, या अध्यायात इतके मुख्यत्वाने आहेत की, ते डोळ्यांना उघड दिसतील. जसे विष्णु आणि शंकर हे एका योग्यतेचे देव प्रेमभावाने एकमेकांस भेटावयास यावे.
तीरें संस्कृताचीं गहनें । तोडोनि मर्हाठियां शब्दसोपानें ।
रचिली धर्मनिधानें । श्रीनिवृत्तिदेवें ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ११, ओवी ९
अर्थ : धर्माची खाण जे माझे गुरु निवृत्तीनाथ त्यांनी मला कारणीभूत करून संस्कृत भाषारूपी कठीण (उंच डगरीचे) किनारे फोडून मराठी भाषेतील शब्दरूपी पायर्यांचा घाट बांधला.
७. संत ज्ञानदेवांनी वर्णिलेली मराठीची थोरवी
१३ व्या अध्यायातील समारोपाच्या ओव्यांत पुनश्च संत ज्ञानदेवांनी मराठीची थोरवी आणि सामर्थ्य प्रकट केले आहे,
एवं जे महाभारतीं । श्रीव्यासें आप्रांतमती ।
भीष्मपर्वसंगतीं । म्हणितली कथा ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११५४
अर्थ : (संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात) याप्रमाणे विशालबुद्धी व्यासांनी महाभारतात भीष्मपर्वामधे शांतरसाने भरलेली कथा सांगितली.
तो कृष्णार्जुनसंवादु । नागरीं बोलीं विशदु ।
सांगोनि दाऊं प्रबंधु । वोवियेचा ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११५५
अर्थ : तो कृष्णार्जुनांचा संवाद ओवीबद्ध काव्यात सुंदर शब्दांनी स्पष्ट करून दाखवू.
नुसधीचि शांतिकथा । आणिजेल कीर वाक्पथा ।
जे शृंगाराच्या माथां । पाय ठेवी ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११५६
अर्थ : केवळ शांतरसाची कथा वाणीच्या मार्गास आणली जाईल (म्हणजे शब्दांनी सांगितली जाईल); परंतु ती शृंगाररसाच्या मस्तकावर पाय ठेवणारी (शृंगाररसावर ताण करणारी), अशी सांगितली जाईल.
दाउं वेल्हाळे देशी नवी । जे साहित्यातें वोजावी ।
अमृतातें चुकी ठेवी । गोडिसेंपणें ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११५७
अर्थ : ज्या रितीने देशी भाषा साहित्याला (अलंकाराला) सजवील आणि अमृताला आपल्या गोडपणाने मागे सारेल, अशा रितीने अपूर्व अन् सुंदर देशी भाषा (मराठी भाषा) उपयोगात आणू.
बोल वोल्हावतेनि गुणें । चंद्रासि घे उमाणे ।
रसरंगीं भुलवणें । नादु लोपी ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११५८
अर्थ : माझे शब्द त्यातील शांत करणारी शक्ती पाहिली, तर चंद्राच्या वर ताण करतील आणि माझे शब्द आपल्या रसातील रंगाच्या मोहक शक्तीने नादब्रह्मास लोपवतील.
खेचरांचियाही मना । आणीन सात्त्विकाचा पान्हा ।
श्रवणासवें सुमना । समाधि जोडे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११५९
अर्थ : पिशाचादि अज्ञानी योनी आहेत; पण त्यासही माझे शब्द सत्त्वगुणाचा पान्हा फोडतील आणि शुद्ध अंत:करणाच्या लोकांना तर माझे शब्द ऐकताच समाधी लागेल.
तैसा वाग्विलास विस्तारू । गीतार्थेंसी विश्व भरूं ।
आनंदाचे आवारूं । मांडूं जगा ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १३, ओवी ११६०
अर्थ : (वरीलप्रमाणे परिणाम घडतील) तसा वाणीच्या विलासाचा विस्तार करू, गीतार्थाने विश्व भरून टाकू आणि सगळ्या जगाला आनंदाचा कोट करू.
(क्रमशः)
(साभार : मासिक ‘प्रसाद’, सप्टेंबर २००६)