‘वैदिक काळापासून संतश्रेष्ठ ज्ञानदेवांच्या काळापर्यंत सर्वच वाङ्मय संस्कृत भाषेत लिहिले जाई. प्रामुख्याने ते पंडितच लिहीत. आपले प्राचीन वेद, म्हणजे ज्ञानाचे भांडार; परंतु त्यातील ज्ञानाचा लाभ समाजातील उच्चवर्णीयांनाच होत असे. खालचा वर्ग आणि स्त्रिया त्यापासून वंचित होत्या. म्हणूनच या वेदांची ‘उदार; परंतु कृपण (कंजूष)’, अशी संभावना संत ज्ञानदेव यांनी खालील ओव्यांत केली आहे,

वेदु संपन्नु होय ठाईं । परी कृपणु ऐसा आनु नाहीं ।
जे कानीं लागला तिहीं । वर्णांच्याचि ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १४५७
अर्थ : वेद मूळचेच संपन्न आहे; परंतु त्याच्यासारखा दुसरा कुणीच कृपण नाही; कारण तो (ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या) तीन वर्णांच्याच कानाला लागला. (म्हणजे वेद ३ वर्णांनीच ऐकावा, अशी त्याची आज्ञा आहे.)
येरां भवव्यथा ठेलियां । स्त्रीशूद्रादिकां प्राणियां ।
अनवसरू मांडूनियां । राहिला आहे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १४५८
अर्थ : संसार दु:खात सापडलेल्या इतर स्त्रीशूद्रादिक प्राण्यांना आपल्या ज्ञानाचा लाभ घेण्यास अधिकार नाही, असे ठरवून वेद स्वस्थ राहिला आहे.
१. संत ज्ञानदेव यांनी ‘ज्ञानेश्वरी’साठी मराठीचे माध्यम निवडण्यामागील कारण
सामान्यजन आणि स्त्रिया यांना संस्कृत भाषेचा गंध नसल्याने, त्यांना संस्कृतच्या कडीकुलपात बंद असलेले ज्ञान त्यांच्याच भाषेत सांगण्यासाठी कुणीतरी क्रांतीकारक पाऊल उचलणे आवश्यक होते. ज्या लोकोद्धारकांना समाजाच्या कल्याणाकरता काही कार्य करायचे असते, ते त्यासाठी त्या त्या समाजाच्या लोकभाषेचे माध्यम निवडतात; कारण त्यायोगे त्यांना समाजाच्या सर्व थरांशी थेट संपर्क साधता येतो, त्यांच्या हृदयाला भिडता येते. संत ज्ञानदेव यांनी हे जाणीवपूर्वक केले. ते म्हणतात,
याकारणें मियां । श्रीगीतार्थु मर्हाठिया ।
केला लोकां यया । दिठीचा विषो ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७३५
अर्थ : या कारणास्तव श्रीगीतेचा अर्थ ज्या लोकांना डोळ्यांनी दिसेल (आकलन होईल), असा स्पष्ट मराठी भाषेत सांगितला.
आपली रचना देशी भाषेतून-मराठीतून संत ज्ञानदेव यांनी केली. त्यांनी ‘देशी’ असा शब्दप्रयोग अनेक ठिकाणी केला आहे; कारण या शब्दात ममत्व साठलेले आहे. ‘गीता’ तत्त्वाच्या या मराठी अवतारात प्रामुख्याने शांत आणि अद्भुत या रसांचाच संचार असला अन् काही ठिकाणी शृंगाररस मुग्ध स्वरूपात डोकावत असला, तरी सर्वत्र शांत रसाचेच साम्राज्य पसरले आहे. मराठीचे समर्थन, तिचे श्रेष्ठत्व, व्यापकत्व, सौंदर्य आणि तिचा अभिमान ज्ञानेश्वरीत ठिकठिकाणी व्यक्त झाला आहे. त्या संबंधीच्या दृष्टांतांचा विचार येथे केला आहे.
२. संत ज्ञानदेव यांनी दर्शवलेला मराठी भाषेविषयीचा अभिमान, तिच्या सामर्थ्याचा प्रत्यय आणि दर्शवलेली कल्पकता !
६ व्या अध्यायाच्या आरंभीला संत ज्ञानदेव म्हणतात, ‘६ वा अध्याय, म्हणजे गीतार्थाचे सारसर्वस्व, क्षीरसागराच्या मंथनातून निघालेले अमृत, विवेकरूपी सागराचे पैलतीर, योगसंपत्तीचा उघडा खजिना, मूलमायेचे विश्रांतिस्थान, वेदांची मौनावस्था. हा अध्याय मी मराठीतून सांगत आहे.’ हे मराठी शब्द कसे असतील ?, त्यांचा परिणाम काय होईल ?, याचे हृदयंगम वर्णन खालील ओव्यांमध्ये पहा,
माझा मराठाचि बोलु कौतुकें । परि अमृतातेंहीं पैजां जिंके ।
ऐसीं अक्षरें रसिकें । मेळवीन ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १४
अर्थ : माझे हे प्रतिपादन मराठी आहे खरे; पण अमृतालाही प्रतिज्ञापूर्वक जिंकेल, अशा तर्हेची रसभरित शब्दरचना मी करीन.
जिये कोंवळिकेचेनि पाडें । दिसती नादींचें रंग थोडे ।
वेधें परिमळाचें बीक मोडे । जयाचेनि ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १५
अर्थ : ज्या माझ्या अक्षरांच्या कोमलपणाच्या मानाने पाहिले असता, सप्तसुरांतील कोमलपणाही थोडाच दिसेल आणि त्या अक्षरांच्या चित्ताकर्षकपणाने सुवासाचे चित्ताकर्षक सामर्थ्यही नाहिसे होईल.
ऐका रसाळपणाचिया लोभा । कीं श्रवणींचि होति जिभा ।
बोलें इंद्रियां लागे कळंभा । एकमेकां ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १६
अर्थ : ऐका, रसाळपणाच्या लोभाने कानास जिभा उत्पन्न होतील आणि माझ्या शब्दांच्या योगाने इंद्रियांमध्ये परस्परांत भांडण लागेल.
सहजें शब्दु तरि विषो श्रवणाचा । परि रसना म्हणे हा रसु आमुचा ।
घ्राणासि भावो जाय परिमळाचा । हा तोचि होईल ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १७
अर्थ : सहज विचार करून पाहिले, तर शब्द हा केवळ कानांचा विषय आहे; परंतु जिव्हा म्हणेल, हा शब्द माझा रसविषय आहे. नाकाला असे वाटेल की, या शब्दाच्या योगाने मला सुवास मिळावा. तो शब्दच अनुक्रमे रस अन् सुवास होईल.
नवल बोलतीये रेखेची वाहणी । देखतां डोळ्यांहीं पुरों लागे धणी ।
ते म्हणती उघडली खाणी । रूपाची हे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १८
अर्थ : या बोलण्याच्या मर्यादेची पद्धत आश्चर्यकारक आहे. ही पाहिली असता डोळ्यांनाही तृप्ती मिळू लागेल आणि ते म्हणतील, ‘हे आम्हाला रूपविषयाचे कोठारच उघडले आहे.
जेथ संपूर्ण पद उभारे । तेथ मनचि धांवे बाहिरें ।
बोलु भुजाही आविष्करें । आलिंगावया ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी १९
अर्थ : संपूर्ण पद जेथे पूर्ण होईल, तेथे त्याच्या भेटीकरता अंत:करण बाहेर धाव घेईल आणि शब्दाला आलिंगन देण्यास बाहूही पुढे सरसावतील.
ऐशीं इंद्रियें आपुलालिया भावीं ।
झोंबती परि तो सरिसेपणेंचि बुझावी ।
जैसा एकला जग चेववी । सहस्रकरु ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी २०
अर्थ : याप्रमाणे इंद्रिये आपापल्या इच्छेप्रमाणे माझ्या शब्दाला लगट करतील; पण तो शब्द सर्वांचे सारखे समाधान करील, ज्याप्रमाणे सूर्य एकटाच सर्व जगाला जागे करतो.
तैसें शब्दाचें व्यापकपण । देखिजे असाधारण ।
पाहातयां भावज्ञां फावती गुण । चिंतामणीचे ।।
– ज्ञानेश्वरी, अध्याय ६, ओवी २१
अर्थ : त्याप्रमाणे शब्दाचे व्यापकपण असामान्य आहे, असे समजावे. याचा विचार करून अभिप्राय जाणणार्याला यात चिंतामणीसारखे गुण दिसून येतील.
येथे संत ज्ञानदेव यांचा मराठी भाषेविषयीचा अभिमान तर दिसून येतोच, याशिवाय तिच्या सामर्थ्याचा प्रत्यय ते श्रोत्यांना आणून देतात. कल्पकतेचे सुंदर उदाहरण म्हणून वरील ओवी १६ कडे बोट दाखवता येईल. वरील ओव्यांत संत ज्ञानदेव यांच्या प्रतिभेचा विलास असा काही बहरला आहे की, त्यामुळे इंद्रियाच्या गोड आणि प्रेमळ अशा कलहाचा प्रसंग-त्याचे शब्दचित्र मनःचक्षूंसमोर उभे रहाते.
(क्रमश:)
(साभार : मासिक : ‘प्रसाद’, सप्टेंबर २००६)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/889611.html