विरोधी पक्षाच्या निवडीवरून मविआमध्ये समन्वयाचा अभाव !

विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता अल्प

मुंबई, ३ मार्च (वार्ता.) – अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असावा, अशी मागणी महाविकास आघाडीतील उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या पक्षांकडून केली जात आहे; मात्र अधिवेशनाला प्रारंभ झाला, तरी महाविकास आघाडीतून विरोधी पक्ष नेतेपदासाठी एकमत झालेले नाही, त्यामुळे त्यासाठीचा प्रस्तावच पाठवण्यात आलेला नाही.

याविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभु यांना विरोधी पक्षनेत्याच्या निवडीविषयी विचारले असता ‘कोणत्या एकाच पक्षाकडून नव्हे, तीनही पक्षांची एकत्रित येऊन याविषयी चर्चा अद्याप झालेली नाही’, असे सांगितले. विरोधी पक्षनेत्याची निवड होण्यासाठी आमदारांच्या एकूण संख्येपैकी किमान १० टक्के तरी जागा विरोधकांतील एकातरी पक्षाकडे असणे आवश्यक आहे; मात्र महाविकास आघाडीतील सर्व पक्षांच्या आमदारांची संख्या १० टक्क्यांहून अल्प आहे. त्यामुळे विधीमंडळ कामकाजाच्या नियमानुसार अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेत्याची निवड होण्याची शक्यता अल्प आहे.