
प्रयागराज, २६ फेब्रुवारी (वार्ता.) – सनातन संस्थेने हिंदु संस्कृतीची माहिती अतिशय सुंदर पद्धतीने आणि सोप्या शब्दांत प्रदर्शनाच्या माध्यमातून मांडलेली आहे. ही माहिती देशाच्या कानाकोपर्यात पोचायला हवी. ही माहिती लहान मुलांना देणे अधिक आवश्यक आहे. सनातन संस्था पुढच्या पिढीला वसा देण्याचे कार्य करत असून ते अतिशय कौतुकास्पद आणि अभिमानास्पद आहे. तुमच्या कार्याला माझ्या शुभेच्छा ! मला जितके शक्य होईल, तितकी सेवा करण्यासाठी मी निश्चित पुढाकार घेईन, असे कौतुकास्पद उद्गार माजी ऑलिंपिकपटू अंजली भागवत यांनी काढले. महाकुंभमेळ्यात आल्यानंतर येथील सेक्टर ९ मध्ये असलेल्या सनातन संस्थेच्या प्रदर्शन कक्षाला त्यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी सर्व प्रदर्शन पाहिले आणि ते पुष्कळ आवडल्याचे सांगून त्यांनी वरील उद्गार काढले. अंजली भागवत यांनी ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत ३ वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले असून आंतरराष्ट्रीय स्तरावर ३१ सुवर्णपदके पटकावली आहेत.