शिवोपासना कशी करावी ?

शिवाला दुग्धाभिषेक करण्याचे महत्त्व ! 

शिवाला दुधाचा अभिषेक करावा; कारण दुधामध्ये शिवाचे तत्त्व आकर्षित करण्याची क्षमता अधिक असल्याने दुधाच्या अभिषेकाच्या माध्यमातून शिवाचे तत्त्व लवकर जागृत होते. त्यानंतर ते दूध तीर्थ म्हणून प्राशन केल्याने शिवतत्त्वाचा अधिक लाभ होतो.

शिवाला बेल वहाणे

ज्या वस्तूंमध्ये विशिष्ट देवतेची पवित्रके आकर्षित करण्याची क्षमता इतर वस्तूंपेक्षा अधिक असते, अशा वस्तू देवतेला वाहिल्या, तर देवतेचे तत्त्व मूर्तीत येऊन देवतेच्या मूर्तीतील चैतन्याचा लाभ आपल्याला लवकर होतो. यासाठीच शिवाला बेल वहावा.

शिवाच्या तारक आणि मारक तत्त्वासाठी वापरायच्या उदबत्त्या !

शिवाची पूजा करतांना त्याचे तारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता केवडा अथवा चमेली, यांपैकी कोणत्याही गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात, तर शिवाचे मारक तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट करण्याकरता हीना अथवा दरबार या गंधाच्या उदबत्त्या वापराव्यात.

शिवाला श्वेत रंगाची फुले वहावीत !

‘विशिष्ट फुलांमध्ये विशिष्ट देवतेचे तत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता अन्य फुलांच्या तुलनेत अधिक असते. धोत्रा, श्वेतकमळ, श्वेत कण्हेर, चमेली, मंदार, नागचंपा, पुन्नाग, नागकेशर, निशिगंध, जाई, जुई, मोगरा, तसेच श्वेत पुष्पे शिवाला वहावीत. या फुलांच्या गंधामुळे शिवाचे तत्त्व पिंडीत अधिक प्रमाणात आकर्षित होते आणि देवतेच्या तत्त्वाचा आपल्याला लाभ होतो. देवतेच्या चरणी फुले विशिष्ट संख्येत वाहिल्यास फुलांकडे त्या त्या देवतेचे तत्त्व लवकर आकृष्ट होते. या तत्त्वानुसार शिवाला १० फुले वहावीत.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘शिवाच्या उपासनेमागील शास्त्र’)