दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप

मिठी नदीतील गाळ काढण्‍याच्‍या प्रकल्‍पाची चौकशी

मिठी नदी

मुंबई – आर्थिक गुन्‍हे शाखेच्‍या विशेष अन्‍वेषण पथकाने मिठी नदीतील गाळ काढण्‍याच्‍या प्रकल्‍पातील कथित अनियमितता आणि निधीचा कथित गैरवापर यांविषयी प्राथमिक चौकशीला आरंभ केला आहे. या प्रकल्पाशी संबंधित ३ कंत्राटदारांची चौकशी केली आहे. मागील २० वर्षांपासून हा प्रकल्प चालू असून १ सहस्र १०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. एकूण १८ कंत्राटदारांना या काळात कंत्राट देण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे.


आरोग्‍य संचालक (शहर) हे पद रिकामेच

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – कोरोना महामारीच्‍या पार्श्‍वभूमीवर शहरी भागातील आरोग्‍य व्‍यवस्‍थेत समन्‍वय आणून ती परिणामकारक करण्‍यासाठी आरोग्‍य संचालक (शहर) हे नवीन पद निर्माण करण्‍यात आले. ४ वर्षे उलटूनही त्‍याची कार्यवाही झालेली नाही. शहरी भागातील आरोग्‍य संस्‍थेच्‍या बळकटीकरणाचे दायित्‍व या संचालकांवर होते. आरोग्‍य विभागात आरोग्‍य संचालकांची ३ पदे असून केवळ १ पद भरले आहे; मात्र प्रशासकीय अधिकारी आणि ६ सहसचिव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


यंदा गुढीपाडवा स्‍वागतयात्रेत मुख्‍यमंत्री

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे – शहरात मराठी नववर्षानिमित्ताने आयोजित करण्‍यात येणार्‍या स्‍वागत यात्रेत यंदाच्‍या वर्षी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्‍या उपस्‍थितीसाठी भारतीय जनता पक्षाचे ठाणे येथील कार्यकर्ते आग्रही होते. यापूर्वी या यात्रेत फडणवीस कधीही उपस्‍थित नव्‍हते. यंदा प्रथमच फडणवीस या यात्रेत सहभागी होणार असल्‍याची माहिती भाजपच्‍या एका वरिष्‍ठ नेत्‍याने स्‍वागत यात्रेच्‍या बैठकीत दिली.


…अन्‍यथा कारवाई करीन !

मुंबई – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मंत्रालयातील पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाच्‍या एका संभाव्‍य निर्णयाविषयी प्रश्‍न विचारण्‍यात आला. त्‍या वेळी मुख्‍यमंत्र्यांनी त्‍यांच्‍या सहकारी मंत्र्यांवर अप्रसन्‍नता व्‍यक्‍त करत ते म्‍हणाले की, मंत्रीमंडळाच्‍या बैठकीआधीच घेण्‍यात येणार्‍या निर्णयांची माहिती प्रसारमाध्‍यमांपर्यंत पोचवणार्‍या अधिकार्‍यांना कारवाई करण्‍याची चेतावणी दिली आहे. हे चुकीचे आहे. मी मंत्र्यांनाही याची सूचना दिली आहे. मंत्र्यांच्‍या कार्यालयांनी याविषयी काळजी घ्‍यावी, अन्‍यथा मी कारवाई करीन.


३ मार्च ते २१ मार्च अर्थसंकल्‍पीय अधिवेशन !

१० मार्चला अर्थसंकल्‍प सादर !

मुंबई – राज्‍याचे अर्थसंकल्‍पीय अधिवेशन ३ मार्चपासून चालू होणार आहे. ३ मार्च ते २१ मार्च या कालावधीत हे अधिवेशन पार पडणार आहे. १० मार्च या दिवशी राज्‍याचे उपमुख्‍यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार राज्‍याचा अर्थसंकल्‍प विधीमंडळात सादर करणार आहेत. दुसर्‍या दिवसापासून अर्थसंकल्‍पावर सर्वसाधारण चर्चा चालू होईल. अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवशी राज्‍यपालांचे अभिभाषण होईल. त्‍यानंतर राज्‍यपालांच्‍या अभिभाषणावर २ दिवस चर्चा होणार आहे. त्‍यानंतर पुरवणी मागण्‍या मांडल्‍या जातील.