कोल्‍हापूर महानगरपालिकेसाठी आरोग्‍य अधिकारी नसल्‍याच्‍या प्रश्‍नात तात्‍काळ लक्ष घालू !

आरोग्‍य साहाय्‍य समितीच्‍या निवेदनावर आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकरांचे आश्वासन

कोल्‍हापूर, १८ फेब्रुवारी (वार्ता.) – केवळ कोल्‍हापूर महापालिकाच नाही, तर राज्‍यातील काही महापालिकांमध्‍ये कायमस्‍वरूपी आरोग्‍य अधिकारी नाहीत. या संदर्भात शासन गंभीर असून या प्रकरणात आम्ही तात्काळ लक्ष घालू, असे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांनी दिले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वर्ष २०१० पासून कायमस्वरूपी आरोग्य अधिकारी नसून ती नेमणूक तात्काळ करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ‘आरोग्य साहाय्य समिती’च्या वतीने आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांना देण्यात आले. त्या वेळी त्यांनी हे आश्वासन दिले.

कोल्‍हापूर शहराचा सततचा विस्‍तार, वाढती लोकसंख्‍या आणि विविध आरोग्‍याच्‍या समस्‍या पहाता येथे कायमस्‍वरूपी आरोग्‍य अधिकारी असणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. इतक्‍या वर्षांपासून आरोग्‍य अधिकारी नसणे, हे दुर्दैवी आहे आणि ते शहराच्‍या आरोग्‍य व्‍यवस्‍थेवरही परिणाम करत आहे. तरी कोल्‍हापूर महानगरपालिकेसाठी कायमस्‍वरूपी आरोग्‍य अधिकारी नेमण्‍यात यावेत, अशी मागणी निवेदनात करण्‍यात आली आहे. या प्रसंगी ‘महाराष्ट्‍र मंदिर महासंघा’चे संयोजक श्री. प्रमोद सावंत, सहसंयोजक श्री. अभिजित पाटील, श्री. सूर्यकांत गुरव, एकवीरादेवी मंदिराचे पुजारी श्री. अनिकेत गुरव, ‘महाराजा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

कोल्‍हापूर महानगरपालिकेमध्‍ये १२ वर्षे उलटूनही कायमस्‍वरूपी आरोग्‍य अधिकारी का नाही ? हेही पहाणे आवश्यक !