पुणे – महापालिकेमध्ये समाविष्ट केलेल्या २३ गावांमधील कर्मचारी महापालिकेच्या सेवेत घेण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस्.एस्. घुले यांची बनावट स्वाक्षरी, लेटरहेड आणि शिक्के वापरून ४७ कर्मचार्यांची सूची असलेले पत्र जिल्हा परिषदेने १४ फेब्रुवारी या दिवशी महापालिकेला पाठवले; मात्र जिल्हा परिषदेने दिलेल्या तक्रारींअन्वये एस्.एस्. घुले वर्ष २०१७ ते २०२१ या कालावधीत उपमुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची सातारा जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून स्थानांतर झाले, असे असतांना त्यांच्या नावाचे बनावट लेटरहेड बनवून आणि बनावट स्वाक्षरी करून हे पत्र पाठवले आहे, अशी तक्रार जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात केली. हे पत्र महापालिकेला मिळाले नसल्याने संबंधित कर्मचार्यांची भरती केली नसल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले आहे.
जिल्हा परिषदेने दिलेल्या ठरावाअन्वये पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत कर्मचार्यांना महापालिकेच्या सेवेत घेण्यात आले; मात्र या प्रक्रियेत मोठा भ्रष्टाचार झाल्याने ६०० हून अधिक कर्मचार्यांना सेवेत घेण्यात आले नाही. त्यानंतर पुन्हा एकदा हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४७ कर्मचार्यांच्या भरतीचे पत्र महापालिकेकडे आले नसून त्याची महापालिकेच्या आवकमध्ये नोंद झालेली नाही. त्यामुळे संबंधित कर्मचार्यांची भरती झाली नाही, असे महापालिकेच्या सेवकवर्ग विभागाने सांगितले आहे.
संपादकीय भूमिका
|