जुना आखाड्याचे महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरि यांचे वक्तव्य
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – आपण भारतातील लोक भावाच्या स्तरावर जगतो. ५० कोटींहून अधिक लोकांनी महाकुंभाला भेट दिली आहे. या महाकुंभाला ज्या पद्धतीने भाविक येत आहेत, त्यावरून मला वाटते की, महाकुंभ हा शब्दही छोटासा आहे. त्याला ‘विराट’, ‘अनंत’ किंवा ‘सनातन कुंभ’ म्हणावे. देशातील सर्वांत मोठ्या पंच दशनाम जुना आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरि यांनी हे विधान केले.
महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरि म्हणाले की…,
१. या देशात खेळांचा कुंभ, शेतकर्यांचा कुंभ आणि विद्यार्थ्यांचा कुंभही आयोजित केला जातो. कुंभ म्हणजे विशालता. प्रयागराजमधील महाकुंभाला ज्या पद्धतीने भाविक येत आहेत, त्यावरून मला वाटते की, याला ‘सनातन कुंभ’ म्हणावे.
२. आपल्या (हिंदूंच्या) सर्व गोष्टी अनंत आहेत, अजिंक्य आहेत. आपण लोक प्राचीन आहोत, शाश्वत आहोत. हिंदु धर्म अनादि काळापासून आहे. आपल्या परंपरा प्राचीन आहेत.
३. कुंभ हा आजचा नाही. तो सत्ययुगाच्या काळापासून आहे. देव आणि दानव यांमधील युद्धाच्या वेळी समुद्रमंथन होऊन प्रयागराज, हरिद्वार, उज्जैन आणि नाशिक येथे अमृताचे थेंब पडले. तेव्हापासून कुंभमेळा साजरा केला जातो.
४. सनातन धर्मामुळेच येथे प्रत्येकजण येत आहे. महाकुंभाला किती स्वीकृती मिळाली आहे, याची कल्पना करा. जे येऊ शकले नाहीत, तेही यात सहभागी आहेत. कुंभाला जगभरात मान्यता आहे. महाकुंभात जातीचे किंवा पंथाचे कोणतेही बंधन नाही. कुणीही जातीविषयी विचारत नाही. येथे सामाजिक सौहार्द आणि विविधतेत एकता दिसून येत आहे.
५. मी उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानतो की, त्यांच्या प्रयत्नांमुळेच इतका चांगला महाकुंभ आयोजित केला जात आहे.
तरुणांमध्ये सत्य जाणून घेण्याची तहान असल्यानेच ते महाकुंभाला मोठ्या प्रमाणात येत आहेत ! – महामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरिमहामंडलेश्वर आचार्य अवधेशानंद गिरि म्हणाले की, आजचा तरुण पुष्कळ जागरूक आहे. महाकुंभाला आलेल्या तरुणांमध्ये आम्ही सत्य जाणून घेण्याची तहान पाहिली. हा कुंभ केवळ भारतियांसाठीच आकर्षक नाही, तर परदेशातही त्याचे पुष्कळ आकर्षण आहे. या वेळी परदेशी भाविकांनी येथे योग, आयुर्वेद आणि उपनिषदे यांच्याविषयी जिज्ञासा दाखवली. ही परिस्थिती पहाता मी असे म्हणू शकतो की, सनातनच्या सूर्याचा प्रकाश आणि तेज जगभर पसरत आहे. तरुणांना त्या संस्कृतीचे सार जाणून घ्यायचे आहे, ज्याचे मर्म हे पाणी, अग्नी, वायू, तेजोमेघ आणि तारे यांत सामावलेले आहे. एक ब्रह्म सर्वव्यापी आहे. येथे एकता दिसून येते. |