पुणे येथे पीओपीच्या मूर्ती बनवणे किंवा विसर्जन करणे यांवर बंदी !

पुणे – प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर उच्च न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यानुसार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सुधारित नियमावली घोषित केली आहे. त्यामध्ये पीओपीची मूर्ती बनवणे किंवा विसर्जन करणे यांवर बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण अधिनियमातील प्रावधानांनुसार कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या मूर्तीकारांना आता शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्या लागणार आहेत. (‘पीओपी’ने पाण्याचे प्रदूषण होत नाही, असा अहवाल ‘सृष्टी इको रिसर्च’ संस्थेने दिला आहे. ‘पीओपी’ नको असेल, तर प्रशासनाने मूर्तीकारांना शाडूमातीसारखे पर्याय मुबलक प्रमाणात प्रथम उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. – संपादक)

महापालिकेने घोषित केलेल्या नियमावलीत काही सूत्रे देण्यात आली आहेत. यामध्ये महापालिका क्षेत्रात मूर्ती या नैसर्गिक, पर्यावरणपूरक जैवविघटक पदार्थांपासून कराव्यात. पीओपीपासून सिद्ध करण्यात आलेल्या मूर्ती बनवणे अथवा विसर्जित करणे यावर पूर्णपणे बंदी असेल. मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात, तसेच मूर्ती स्वीकृती केंद्रामध्ये देणे बंधनकारक असेल. (पीओपीची मूर्ती बनवण्यावर बंदी असल्याने मूर्तीकारांना आता शाडू मातीच्या मूर्ती बनवाव्या लागणार आहेत. असे असेल, तर शाडू मातीच्या मूर्तीमुळे कोणतेही प्रदूषण होत नसतांना त्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचा अट्टहास कशासाठी ? – संपादक) पूजेसाठी फुले, वस्त्र, पूजा साहित्य पर्यावरणपूरक असावे.