Hindu Temple Under Church : केरळमध्ये चर्चच्या भूमीमध्ये सापडले १०० वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या मंदिराचे अवशेष

चर्चकडून हिंदूंना विधी करण्याची सहमती

प्रातिनिधिक छायाचित्र

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळच्या पलाई येथील कॅथॉलिक चर्चच्या भूमीवर हिंदूंच्या एका जुन्या मंदिराचे अवशेष सापडले, त्यानंतर चर्चने हिंदु भाविकांना देवाची इच्छा जाणून घेण्यासाठी देवप्रसन्नम् (एक ज्योतिषीय विधी) करण्याची अनुमती दिली आहे. स्थानिक हिंदु संघटना आणि चर्चच्या म्हणण्यानुसार गेल्या आठवड्यात जेव्हा लागवडीसाठी १.८ एकर भूमीचे उत्खनन केले जात होते, तेव्हा मंदिराचे अवशेष सापडले, ज्यामध्ये शिवलिंगाचाही समावेश होता.

हिंदूंनी केला पाद्र्यांशी संपर्क

श्री वनदुर्गा भगवती मंदिर समितीचे सदस्य विनोद के.एस्. म्हणाले की, मंदिराचे अवशेष ४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी सापडले होते; परंतु ते २ दिवसांनी आम्हाला कळले. यानंतर आम्ही त्वरित पलाई बिशप हाऊसच्या पाद्र्यांशी संपर्क साधला. त्यांनी देवप्रसन्नम् करण्यास सहमती दर्शवली.

चर्चची भूमी पूर्वी एका ब्राह्मण कुटुंबाच्या मालकीची होती

‘पलाई डायोसिस’चे कुलपती फादर जोसेफ कुट्टियांकल यांनी सांगितले की, चर्चच्या ठिकाणी एका मंदिराचे अवशेष सापडले आहेत. पलईच्या हिंदूंशी आमचे सौहार्दपूर्ण संबंध आहेत आणि ते आम्ही कायम ठेवू. आमचा बिशपच्या (वरिष्ठ पाद्रीच्या) अधिकारातील प्रदेश त्यांच्या भावनांचा आदर करतो. जुने लोक या ठिकाणी मंदिर असल्याबद्दल बोलत असत. ही भूमी पूर्वी एका ब्राह्मण कुटुंबाच्या मालकीची होती. अनुमाने १०० वर्षांपूर्वी हे मंदिर नष्ट झाले आणि ही मालमत्ता अनेक लोकांच्या हाती गेली आणि शेवटी पलई डायोसिसकडे आली.