नाशिक शहर ‘उडता पंजाब’ होण्यापूर्वी वाढत्या नशाखोरीवर तातडीने कठोर कारवाई करा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

पोलीस उपायुक्तांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

नाशिक – नाशिक शहरातील गंगापूर रोड, कॉलेज रोड, इंदिरानगर, पंचवटी आणि इतर भागांत नशेखोरी, अमली पदार्थांची विक्री, क्लब आणि हुक्का पार्लरमधील अनैतिक कृत्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. यामुळे युवक-युवतींमध्ये व्यसनाधीनता वाढत असून सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन आणि सर्रास कायद्याचे उल्लंघन होत आहे. शहरातील काही क्लब, पब, हॉटेल आणि हुक्का पार्लर्समध्ये एम्.डी.सारखे अमली पदार्थ, गांजा, कोकेन आणि इतर घातक मादक पदार्थ यांचे सेवन अन् विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. यामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असून समाजात अपप्रवृत्ती वाढत आहेत. जर प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई केली नाही, तर येत्या काळात नाशिक शहर ‘उडता पंजाब’ होण्यास वेळ लागणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या घटनांमध्ये नशेच्या प्रभावाखाली पोलिसांशी वाद घालणार्‍या युवक-युवतींचे व्हिडिओ प्रसारित झाले असून ही स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. या समस्येवर तातडीने कठोर उपाययोजना करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या वतीने पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

हिंदु जनजागृती समितीच्या प्रमुख मागण्या !

१. रात्री १० नंतर पब, क्लब आणि हुक्का पार्लर बंद ठेवावेत. मादक पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांना तातडीने अटक करावी.

२. अमली पदार्थ तस्कर आणि पुरवठादार यांना पकडण्यासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करावे.

३. शाळा-महाविद्यालयांत नशाबंदी आणि व्यसनमुक्ती यांविषयी जनजागृती अभियान राबवावे. पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करून युवकांच्या संगतीवर लक्ष ठेवण्यास प्रवृत्त करावे.

४. लव्ह जिहाद आणि फसवणूक यांच्या घटनांसाठी स्वतंत्र अन्वेषण पथक सिद्ध करावे.

या मागण्यांचे नाशिक येथील अप्पर जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र वाघ आणि पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देण्यात आले. या वेळी ‘भारतीय स्त्री शक्तीच्या सौ. अनिता मुठे, सौ. जयश्री चव्हाणके, देवस्थान समितीचे नंदकिशोर भावसार, अधिवक्ता ललिता कुलकर्णी, अधिवक्ता प्रियांका जाधव, अधिवक्ता प्रेरणा वाघ, अधिवक्ता संदीप जाधव, विश्व हिंदू सेनेचे अधिवक्ता महेंद्र शिंदे, अनंत खाडिलकर, मंदिर महासंघाचे नाशिक जिल्हा संयोजक किसन गांगुर्डे, सहसंयोजक दिनेश मुठे, चेतन सूर्यवंशी, सनातन संस्थेच्या सौ. वैशाली अहिरराव, सौ. मीनाक्षी कोल्हे, हिंदु जनजागृती समितीचे अमोल शिंदे, सुमंत वैद्य, कु. रागेश्री देशपांडे उपस्थित होत्या.

‘याविषयी कठोर पावले उचलण्यास पोलीस प्रशासनाने प्रारंभ केला असून यापुढेही अशा घटनांचा अभ्यास करून तातडीने कठोर उपाययोजनात्मक कारवाई करण्यात येईल’, असे आश्वासन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी दिले.

संपादकीय भूमिका

तरुण युवक-युवती रात्री उशिरापर्यंत घराबाहेर जाऊन काय करतात, याकडे लक्ष ठेवणे पालकांचे कर्तव्य नाही का ?