President Murmu At Sangam : महाकुंभ येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संगमावर केले स्नान !

उत्तराखंडाच्या मुख्यमंत्र्यांनीही केले स्नान

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे महाकुंभ येथे स्वागत केले.

प्रयागराज – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाकुंभामधील त्रिवेणी संगम येथे स्नान केले. त्यांनी संगमामध्ये ३ डुबकी घेऊन भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केले आणि स्नानापूर्वी गंगामातेला पुष्प अर्पित केले. या वेळी मंत्रोच्चाराच्या वातावरणात गंगा पूजन आणि आरती झाली. यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी लेटे हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि आरती केली. त्यानंतर अक्षय्यवट धाम येथे जाऊन पूजन केले. त्यांच्यासमवेत उत्तरप्रदेशाच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.
उत्तराखंडाचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी कुटुंबासमवेत संगममध्ये स्नान करून भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण केले. महाकुंभमध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असल्याने अरैल घाट ते संगम या मार्गावर बोटसेवा बंद करण्यात आली आहे.

संतांच्या हस्ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रपतींनी लेटे हुए हनुमान मंदिर दर्शन आणि पूजन केले.
राष्ट्रपतींनी अक्षयवट येथे जाऊन दर्शन आणि पूजा केली.    

वर्ष १९५४ नंतर कुंभक्षेत्री स्नान करणार्‍या देशाच्या दुसर्‍या राष्ट्रपती 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या महाकुंभामध्ये स्नान करणार्‍या देशाच्या दुसर्‍या राष्ट्रपती ठरल्या आहेत. यापूर्वी वर्ष १९५४ मध्ये पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी महाकुंभामध्ये स्नान केले होते.