UK’s Royal Navy : ‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने औपचारिक ‘ड्रेस कोड’मध्ये केला साडीचा समावेश !

(ड्रेस कोड, म्हणजेच वस्त्रसंहिता म्हणजे एखाद्या ठिकाणी परिधान करायच्या कपड्यांच्या संदर्भातील नियमावली)

लंडन (ब्रिटन) – ‘ब्रिटीश रॉयल नेव्ही’ने त्यांच्या महिला अधिकार्‍यांसाठी औपचारिक ‘ड्रेस कोड’मध्ये साडी, सलवार कमीज आणि लेहेंगा समाविष्ट केले आहेत. ब्रिटीश नौदलाने त्याचा पोशाख अधिक समावेशक बनवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. या नवीन ‘ड्रेस कोड’च्या अंतर्गत महिला अधिकारी आता कोणत्याही औपचारिक कार्यक्रमात ‘जॅकेट’खाली साडीसह सांस्कृतिक पोशाख नेसू शकतात.

१. या ‘ड्रेस कोड’विषयी ‘रॉयल नेव्ही रेस डायव्हर्सिटी नेटवर्क’ (आर.डी.एन्.) चे अध्यक्ष लान्स कॉर्पोरल जॅक कनानी यांनी सामाजिक माध्यमावर ही माहिती प्रसारित केली आहे. यासमवेतच त्यांनी एक छायाचित्रही प्रसारित केले आहे, ज्यामध्ये कॅप्टन दुर्दाना अन्सारी जॅकेटखाली साडी नेसलेल्या दिसत आहेत. महिलांना साडीवर ‘ब्लॅक बो’ आणि पांढरा शर्ट देखील घालावा लागेल.

२. कनानी यांनी सांगितले की, धोरणात सुधारणा करण्यापूर्वी महिलांचे मत विचारण्यात आले होते.

३. अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि म्हटले की, यामुळे अधिकार्‍यांना त्यांची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख टिकवून ठेवत सेवा देता येणार आहे.