Extremist Groups Gather In PoK : (म्हणे) ‘देहलीत रक्तपात घडवून काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची वेळ आली !’ – ‘हमास’ आणि पाकिस्तानी आतंकवादी

पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘हमास’ आणि पाकिस्तानी आतंकवादी संघटनांची घोषणा

नवी देहली – इस्रायलमध्ये आतंकवादी आक्रमणे करणार्‍या ‘हमास’ने ५ फेब्रुवारी या दिवशी काश्मीरमध्ये जैश-ए-महंमद, लष्कर-ए-तोयबा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटनांशी हातमिळवणी केली. पाकव्याप्त काश्मीरमधील रावलकोटमधील शहीद साबीर स्टेडियममध्ये आयोजित ‘काश्मीर एकता दिन’ आणि ‘हमास ऑपरेशन अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स’ या कार्यक्रमात जैश-ए-महंमदच्या एका आतंकवाद्याने मंचावरून काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची घोषणा केली. या आतंकवाद्याने भारताला धमकी देतांना म्हटले की, पॅलेस्टाईनचे आणि काश्मीरचे मुजाहिदीन (इस्लाम धर्मासाठी जिहाद करणारे लोक) आता एक झाले आहेत. देहलीत रक्तपात घडवून काश्मीरला भारतापासून वेगळे करण्याची वेळ आली आहे.

या कार्यक्रमाला जैश-ए-महंमदचा प्रमुख मसूद अझहर याचा भाऊ तल्हा सैफ, जैशचा कमांडर असगर खान काश्मिरी आणि मसूद इलियास अन् पाक सैन्याचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‘हमास’चा आतंकवादी डॉ. खालिद अल-कदौमी याचीही उपस्थिती होती. हमासच्या आतंकवाद्यांचा हा पहिलाच काश्मीर दौरा होता. याखेरीज अनेक पॅलेस्टिनी नेत्यांनीही या कार्यक्रमात भाग घेतला. पाकिस्तान ५ फेब्रुवारी या दिवशी ‘काश्मीर एकता दिन’ साजरा करतो.

संपादकीय भूमिका

पाकिस्तानी आतंकवाद्यांना जे शक्य झाले नाही आणि पुढेही होऊ शकणार नाही, त्यासाठी हमासला समवेत घेण्याचा प्रयत्नही अयशस्वी होणार, हे त्यांनी लक्षात ठेवायला हवे. यासाठी भारताने हमासला चेतावणी देण्यासाठी पाकव्याक्त काश्मीरवर कारवाई करणे आवश्यक आहे !