थिवी (गोवा) येथील पॉल फोन्सेको याला अटक
म्हापसा, ५ फेब्रुवारी (वार्ता.) – लहान मुलांवर अत्याचार करणार्या थिवी येथील पॉल फोन्सेको याच्या कह्यातून कोकण रेल्वे पोलिसांनी एका ११ वर्षीय मुलीची सुटका केली. त्यानंतर या संशयिताला कोकण रेल्वे पोलिसांनी कोलवाळ पोलिसांच्या कह्यात दिले आहे. पॉल लहान मुलांना खाऊचे आणि भेटवस्तू देण्याचे आमीष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करतो, अशी माहिती समोर आली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार ४ फेब्रुवारी या दिवशी पहाटे ३ वाजता कोकण रेल्वे पोलिसांना लैंगिक अत्याचाराविषयी माहिती मिळाल्यानंतर त्यांनी थिवी रेल्वेस्थानकावर धाव घेऊन लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या एका ११ वर्षीय मुलीची सुटका केली आणि या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या संशयित पॉल फोन्सेको याला कह्यात घेतले. या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली
होती. ही अत्याचाराची घटना २ फेब्रुवारी या दिवशी घडली. संशयिताने या मुलीचे अपहरण करून तिचा लैंगिक छळ केला. त्यानंतर त्या मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला आणि पालकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट (दाखल) केली. या तक्रारीच्या आधारे कोलवाळ पोलिसांनी संशयितावर भारतीय दंड संहितेच्या १३७(२), ११५(२), ३५१(२) या कलमानुसार, तसेच गोवा बाल कायदा कलम ८(२) आणि पोक्सो कायदा कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा नोंद केला आहे.
या ११ वर्षांच्या पीडित मुलीने ‘बायलांचो एकवोट’ या संघटनेच्या समुपदेशकाला दिलेल्या माहितीनुसार पॉल फोन्सेको हा उपेक्षित वर्गातील लहान मुलांना खाऊ देणे, भेटवस्तू देणे, गाडीवरून फिरवणे वगैरे आमीष दाखवून त्यांना जवळ घेऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. ११ वर्षीय पीडित मुलीच्या लहान भावावरही संशयिताने अत्याचार केला आहे. पॉल हा इतरही काही मुलांना आमीष दाखवून घरी नेत असे आणि त्यांना मादक द्रव्ये प्यायला देऊन त्यांच्यावर अत्याचार करत असे. तसेच त्यांच्यावर अश्लील चित्रफिती पहाण्यासाठी बळजोरी करत असे. मुलांवर अत्याचार केल्यानंतर त्यांना तो
धमकावत असे आणि घरी पोचवण्यासाठी हट्ट धरल्यास मारहाण करत असे. कोकण रेल्वे पोलीस अधीक्षक हरिश मडकईकर, उपअधीक्षक नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गुडलर यांनी ही कारवाई केली.