
देहू (जिल्हा पुणे) – जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष मोरे महाराज (वय ३१ वर्षे) यांनी रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक विवंचनेतून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा प्राथमिक अंदाज आहे, मात्र ‘अधिक चौकशी करून खरे कारण समोर आणले जाईल’, असे देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण देहू गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनामुळे देहूतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी, तसेच धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी, श्रीक्षेत्र देहूगाव येथे पार पडले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी छताच्या पंख्याच्या हुकाला उपरण्याने गळफास घेतला. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक चिठ्ठी लिहून ठेवल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी चिठ्ठी कह्यात घेतली असून त्याचे अन्वेषण चालू आहे.
शिरीष मोरे महाराज यांचा विवाह २० फेब्रुवारीला होणार होता. त्यांनी नुकतेच नवीन घर बांधले होते. आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असला, तरी घर बांधल्यानंतर मोठ्या प्रमाणावर आर्थिक ओझे वाढले होते का, याचे अन्वेषण केले जात आहे.
प्रखर हिंदुत्ववादी विचारक !
शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकिक होता. ‘ज्याच्या कपाळावर नाही टिळा, त्यांच्याकडून खरेदी करणे टाळा’, असे आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत. हिंदूंवर होणार्या अन्याय-अत्याचारावर ते कायम भाष्य करत होते. ‘लव्ह जिहाद’, ‘उद्योग जिहाद’, ‘लँड जिहाद’, ‘अन्न जिहाद’, धर्मांतर यांसारख्या प्रकरणावरही त्यांचे भाष्य गाजले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे ठरवून इस्लामीकरण करणार्यांना सडेतोड उत्तर देणार्यांमध्ये महाराज पुढे असायचे.
हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडणारे नेतृत्व पडद्यामागे गेले ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
वारकरी संप्रदाय, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अशा विविध माध्यमांतून देव, देश आणि धर्म यांसाठी ते सतत कार्यरत होते. हिंदु जनजागृती समितीच्या कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. हिंदुत्वाची भूमिका ठामपणे मांडणारे, वारकरी सांप्रदायाचे एक समर्थ नेतृत्व पडद्यामागे गेले !