मुंबई – कृषी क्षेत्रात क्रांतीकारी पालट घडवून शेतकर्यांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादन खर्च अल्प करण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेचा (आर्टिफिशिअल इंटेलिजिन्स) वापर करण्याचा शासन गांभीर्याने विचार करत आहे. यासाठी कृषी विभागाने सहकार विभागासमवेत समन्वय साधून या प्रकल्पाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता पडताळावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. महाराष्ट्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर वाढत आहे. अवेळी पडणारा पाऊस, रोगांचा प्रादुर्भाव, कामगारांची कमतरता अशा समस्या वाढत आहेत. त्या संदर्भात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्यात येत आहे.
पीक आरोग्याचे विश्लेषण, मातीतील कार्बन आणि पोषणतत्त्वांचे निदान, मातीच्या आरोग्याचा सखोल अभ्यास, तण, कीड आणि रोग यांचा त्वरित शोध आणि उपाययोजना, मातीचे तापमान आणि वातावरणातील आर्द्रतेचे मोजमाप, पूर्वीच्या उत्पादनांची तुलना करून अधिक उत्पादनक्षम पद्धतीची कार्यवाही, पुरवठा साखळी अधिक कार्यक्षम बनवणे आणि व्यय अल्प करणे, शेतकर्यांच्या जीवनात आमूलाग्र पालट घडवणे या संदर्भात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर केला जाईल, असे पवार या वेळी म्हणाले.