आंतरशहरी रेल्वेगाड्या चालू करण्याची गोवा शासनाची योजना ! – मुख्यमंत्री सावंत

पुढील २ वर्षांत पेडणे ते काणकोण रेल्वेगाडी चालू होण्याची शक्यता

पणजी, ४ फेब्रुवारी (वार्ता.) – गोवा सरकार पुढील १-२ वर्षांत पेडणे ते काणकोण मार्गावर रेल्वेसेवा चालू करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. ही रेल्वे ‘वन्दे भारत’ रेल्वेसारखीच असेल. पेडणे ते काणकोणपर्यंतची रेल्वेगाडी पहिल्या टप्प्यात चालू केली जाईल; कारण ते सोपे होईल, असेही सावंत म्हणाले. पर्वरी येथे विधानसभा संकुलात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

सावंत पुढे म्हणाले, ‘‘फोंडा आणि पणजी यांसारख्या इतर शहरांसाठी रेल्वे जोडणीचा पाठपुरावा केला जाईल. रस्ते वाहतुकीवरील अवलंबित्व अल्प करणे आणि रेल्वे वाहतूक वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे. कारवार आणि सिंधुदुर्गपर्यंत रेल्वेजोडणी वाढवण्याची योजना आहे. कोकण रेल्वे आणि दक्षिण-पश्चिम रेल्वे यांसाठी रेल्वे पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी रेल्वे अर्थसंकल्पात गोव्यासाठी ४८२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सारझोरा, मये, न्यूरा या नवीन स्थानकांचा विकास आणि मडगाव रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास करण्याचे काम चालू आहे.’’

पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत १०२ कोटी रुपये संमत

पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत रस्त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी गोव्याला १०२ कोटी रुपये संमत करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

‘आयआयटी’ची पायाभरणी लवकरच

गोव्यात ‘आयआयटी’साठी (भारतीय तंत्रज्ञान संस्थेसाठी) कायमस्वरूपी संकुल उभारले जाणार आहे. त्यासाठी जागा निश्चित करून लवकरच पायाभरणी केली जाईल. आयआयटी प्रकल्पासाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी उद्यापासून विनामूल्य विशेष रेल्वे

गोव्यातून प्रयागराज येथे महाकुंभमेळ्याला जाण्यासाठी गोव्यातून विशेष रेल्वे सोडण्यात येणार असून भाविकांसाठी ६ फेब्रुवारीपासून ती विनामूल्य चालू करण्यात येणार आहे. ही सुविधा ‘मुख्यमंत्री देवदर्शन योजने’च्या अंतर्गत चालू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत ३ गाड्या सोडण्यात येणार आहेत. ६ फेब्रुवारीला मडगावहून सकाळी ८ वाजता रेल्वे निघेल. त्यानंतर १३ फेब्रुवारी आणि २१ फेब्रुवारील आणखी २ रेल्वेगाड्या सोडल्या जातील. १८ ते ६० वर्षे वयोगटातील आणि ज्यांना आजार नाही, असे लोक यासाठी पात्र आहेत. आरक्षणासाठी ०८३२-२२३२२५७ या क्रमांकावर संपर्क करावा.