
दोडामार्ग – तालुक्यात एक हत्ती येथील शेती आणि बागायती यांची हानी करत होता. आता लहान पिल्लांसह ५ हत्तींचा कळप येथे दाखल झाला असून या कळपाकडून अनेक गावांत हानी करण्यात येत आहे.
हा कळप घाटीवडे, बांबर्डे, सोनावल, मोर्ले आणि केर या गावांत उपद्रव करत आहे. कळप हेवाळे गावात येऊ नये, यासाठी वन विभागाचे पथक दिवसरात्र घाटीवडे, बांबर्डे येथे तैनात आहे. दिवसाढवळ्या हा कळप वावरत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकरी यांना घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. १ फेब्रुवारीला पहाटे हत्तींनी केर गावात येऊन येथील शेतकर्यांची मोठी हानी केली.

सध्या उन्हाळी शेती, तसेच काजू बागायतीचा हंगाम आहे. नारळ, सुपारी, केळी यांच्याही बागा येथे आहेत. या बागांची हानी मोठ्या प्रमाणात केली जात असल्याने आर्थिक हानीसह शेतकर्यांचे श्रमही वाया जात आहेत. हत्तींच्या विरोधात ठोस उपाययोजना राबवण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे; मात्र त्याकडे सरकार आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने हत्तींकडून होणारी हानी केवळ बघत रहाण्यापलीकडे आम्ही काय करू शकतो ? असा प्रश्न शेतकरी, बागायतदार यांच्यासह ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना काढण्यात येत
नसल्याचे वन विभागाच्या विरोधात संतप्त ग्रामस्थ आंदोलनाची भूमिका घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
संपादकीय भूमिकाहत्तींमुळे निर्माण झालेली समस्या वेळीच न सोडवल्यामुळे ती आता आणखी वाढत आहे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |