‘जुनी पुराणी नाव माझी किनार्‍याला लाव ।’, ही अभंगाची ओळ ऐकून सनातनचे पू. शिवाजी वटकर यांना परात्पर गुरु डॉक्टरांप्रती वाटलेली कृतज्ञता !

देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात वयस्कर साधकांच्या व्यष्टी साधनेच्या आढावा सत्संगामध्ये एकदा एका साधकाने भावजागृतीचा प्रयोग सांगितला. त्या वेळी त्यांनी एका अभंगातील पुढील ध्रुवपद भावपूर्ण रितीने म्हटले, ‘जुनी पुराणी नाव माझी किनार्‍याला लाव । मनोहर रूप तुझे देवा मला दाव ।’ त्या सत्संगातील सर्व साधकांचे वय ७० वर्षांच्या आसपास होते. ‘सद्गुरु राजेंद्र शिंदे व्यष्टी साधनेचा आढावा कसा घेतात ?’, हे शिकण्यासाठी मलाही त्या आढाव्याला बसण्याची संधी मिळाली होती. आता माझेही वय ७४ वर्षे आहे. (वर्ष २०२४ मधील वय ७८ वर्षे) आमच्या शारीरिक स्थितीचा विचार केला, तर आमची ‘शरीररूपी नाव म्हणजे जहाज’, हे जुने झाले आहे. ते तरून जाण्यासाठी आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना करत होतो. तेव्हा याची जाणीव होऊन आम्हा सर्वांची भावजागृती झाली. त्या वेळी माझ्या मनात आले, ‘अभंगाच्या २ ओळी इतक्या चांगल्या आहेत, तर पूर्ण अभंग कसा असेल ?’ या जिज्ञासेने मी माहिती जालस्थळावर शोधल्यावर मला हा अभंग मिळाला. 

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

जुनी पुराणी नाव माझी किनार्‍याला लाव ।
मनोहर रूप तुझे देवा मला दाव ।। धृ. ।।

पापाचे पर्वत बाई पुण्याचा लेश नाही ।
नऊ महिने गर्भी असतांनाही नाही आठवले नाव ।। १ ।।

कल्पनेच्या उसळती लाटा झोका खात खात ।
मध्यावरी आली आता बुडूनची जाई नाव ।। २ ।।

पुरे पुरे संसार यातना होती ज्यात अपार ।
तुमच्या वाचून नाही देवा कोणाचा आधार ।। ३ ।।

नामदेवाने हट्ट धरिला जेविले पंढरीराव ।
जनी म्हणे आता तरी देवा मला पाव ।। ४ ।।

(पू.) शिवाजी वटकर

‘एकदा एका साधिकेने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना तिला पडलेले एक स्वप्न सांगितले. त्या स्वप्नात ‘गुरुदेव तिला सोडून गेले आहेत’, असे दृश्य दिसले होते. तिने ते स्वप्न एका साधकाच्या माध्यमातून गुरुदेवांना सांगितल्यावर त्यांनी उत्तर दिले, ‘‘मी माझ्या साधकांना कधीच सोडून जात नाही.’’


‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या प्रत्येक ग्रंथांमध्ये पहिल्या पृष्ठावर लिहिले आहे की, माझ्या स्थूल देहाला मर्यादा असल्या, तरी मी सनातन धर्माच्या रूपाने सर्वत्र आहे, म्हणजेच ते सनातनच्या सर्व साधकांच्या सुख-दुःखात किंवा प्रत्येक प्रसंगात सूक्ष्म रूपाने समवेत असतातच !’

– (पू.) शिवाजी वटकर (१०.५.२०२०)

१. ‘जुनी किंवा नवी, कसलीही नाव असली, तरी परात्पर गुरु डॉक्टर सनातनच्या साधकांना मोक्षापर्यंत घेऊन जाणार आहेत’, याची शाश्वती असणे

एकदा माझे मित्र श्री. तुकाराम लोंढे रामनाथी (गोवा) येथे गेले असता त्यांनी एका साधकाच्या माध्यमातून गुरुदेवांना कळवले, ‘आता वटकरकाकांचे वय झाले आहे. त्यांची प्रगती झाली, तर बरे होईल !’’ त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी एका साधकाच्या माध्यमातून मला निरोप पाठवला, ‘‘त्यांची (वटकरकाकांची) साधना चांगली चालू आहे. तुम्ही काळजी करू नका ! त्यांचे वय झाले आहे’, याचा विचार करायला नको; कारण त्यानंतरही, म्हणजे पुढील जन्मीही मी त्यांच्यासमवेत आहेच !’’

यावरून ‘वयस्कर झालो, शरीर थकले; म्हणजे माझी जुनी पुराणी नाव किनार्‍याला लाव’, असे माझे म्हणणे किती चुकीचे आहे ?’ हे माझ्या लक्षात आले; कारण नवी किंवा जुनी कसलीही नाव असली, तरी परात्पर गुरु डॉक्टर सनातनच्या साधकांना मोक्षापर्यंत घेऊन जाणारच आहेत. याची शाश्वती त्यांनीच आम्हा साधकांना दिली आहे. त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

२. परात्पर गुरुदेव सर्व साधकांकडून योग्य साधना करून घेऊन त्यांच्या जन्माचे सार्थक करून घेत असणे

‘लहान-मोठे, गरीब-श्रीमंत, शिक्षित-अशिक्षित अशा सर्व साधकांवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कृपाछत्र आहे’, हे मी मागील ३० वर्षांपासून स्वतः अनुभवले आहे. त्यांच्या कृपाछत्राखाली असणारा प्रत्येक साधक नेहमीच आनंदी असतो. यामुळे साधकाची शरीररूपी नाव जुनी-नवी कशीही असो, ते हा भवसागर पार करून देतात. त्यामुळेच सनातन परिवारात जन्मलेले बालक संतपदाला पोचते. वरील अभंगातील प्रार्थना श्री गुरूंच्या चरणी पोचली असल्याने ते साधकांकडून योग्य साधना करून घेऊन सर्व साधकांच्या जन्माचे सार्थक करत आहेत.

३. साधकरूपी जहाजाची स्वभावदोष आणि अहं रूपी छिद्रे वेळीच बंद केल्याने ते जहाज न बुडता किनार्‍याकडे, म्हणजे मोक्षाच्या मार्गावर आनंदाने वाटचाल करत असणे

परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘गुरुकृपायोग’ हा अष्टांग साधनामार्ग सांगितलेला आहे. त्यामध्ये स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाला ६० टक्के महत्त्व दिले आहे. त्यामुळे आध्यात्मिकदृष्ट्या अडचणीत असलेला आणि आध्यात्मिक घसरण होत असलेला साधक स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया केल्यामुळे त्या स्थितीतून त्वरित बाहेर येतो. या साधकरूपी जहाजाची स्वभावदोष आणि अहं रूपी छिद्रे वेळीच बंद केल्याने ते जहाज न बुडता किनार्‍याकडे, म्हणजे मोक्षाच्या मार्गावर आनंदाने वाटचाल करत रहाते. गुरुकृपायोगानुसार साधना करतांना साधकावर जन्म-मृत्यू, गर्भावास, लहान-मोठेपणा इत्यादींचा विचार करून, दुःख करत बसून धावा करण्याची वेळ येत नाही. त्यांनी सर्व साधक, तसेच साधकांचे कुटुंबीय यांचेही दायित्व घेतलेले आहे.

सनातनच्या सर्व साधकांनी भावनिक स्तरावर न रहाता परात्पर गुरु डॉक्टरांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार प्रामाणिकपणे साधना करत रहायचे आहे. त्यासाठी ‘श्री गुरूंनी आम्हा साधकांकडून त्यांना अपेक्षित असे प्रयत्न करून घ्यावेत’, अशी प्रार्थना आहे.’

– (पू.) शिवाजी वटकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(१०.५.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक