आखाडे हे कुंभमेळ्याचा आत्मा आहे. या केवळ धार्मिक संस्था नाहीत, तर सनातन धर्माचे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक संरक्षक आहेत. कुंभमेळ्यात असलेली आखाड्यांची उपस्थिती त्याला अद्वितीय आणि जिवंत करतात. साधू आणि संत यांना एकत्रित करून त्यांना धर्म अन् समाज यांच्या रक्षणासाठी संघटित करणार्या संघटना आहेत. यांच्या माध्यमातून कुंभमेळा केवळ धार्मिक आयोजन न रहाता आध्यात्मिकता आणि शक्ती यांचा संगम बनतो.
१. आखाड्यांचा इतिहास
आखाड्यांची उत्पत्ती आद्यशंकराचार्यांच्या वेळची मानली जाते. आद्यशंकराचार्यांनी आखाडे स्थापन करण्याचा प्रारंभीचा उद्देश सनातन धर्माचे संरक्षण, प्रचार आणि प्रसार हा होता.
ती अशी वेळ होती की, बौद्ध, जैन धर्म आणि विदेशी आक्रमणे ही सनातन धर्मासमोर आव्हाने होती. आखाड्यांनी केवळ धार्मिक परंपरांचे रक्षण केले नाही, तर समाजाला धर्माविषयी जागृत केले. आखाड्यांचा प्रारंभिक उद्देश केवळ धर्मप्रचार नव्हता, तर धर्माच्या रक्षणासाठी ते प्रशिक्षित योद्धे होते.
२. आखाड्यांचे ३ वर्गांमध्ये विभाजन आणि नागा साधू

अ. शैव आखाडे (शिव उपासक) : हे आखाडे भगवान शिवाची उपासना करतात. जुना आखाडा, अटल आखाडा आणि महानिर्वाणी आखाडा हे शैव आखाड्यांपैकी प्रमुख आहेत.
आ. वैष्णव आखाडे (विष्णु उपासक) : हे आखाडे भगवान विष्णु आणि त्यांचे अवतार यांची उपासना करतात. यांतील निर्वाणी, दिगंबर आणि निर्माेही हे प्रमुख आखाडे आहेत.
इ. उदासीन आखाडे (सार्वभौमिक उपासना) : हे आखाडे कोणत्याही एका विशिष्ट देवतेची उपासना करत नाहीत. हे सर्व धर्म आणि मते यांना समान मानतात.
ई. नागा साधू : यांचा संबंध मुख्यतः शैव आखाड्याशी आहे. ते निर्वस्त्र रहातात आणि कठोर तपस्या करतात. नागा साधू हे धर्म आणि संस्कृती यांच्या रक्षणासाठी नेहमीच सिद्ध असतात.
३. कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांची भूमिका
कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे दिसून येते. त्याविषयी सांगायचे तर..
अ. अमृत स्नानाचे नेतृत्व : कुंभमेळ्यातील सर्वांत पवित्र आणि प्रतिकात्मक अनुष्ठान, म्हणजे अमृत स्नान आहे. आखाड्यांतील साधू-संत या स्नानाचे नेतृत्व करतात. अमृत स्नान हे आखाड्यांची शक्ती आणि प्रतिष्ठा यांचे प्रतीक आहे.
आ. धर्म आणि संस्कृती यांचा प्रचार : कुंभमेळ्यामध्ये आखाडे हे आपल्या अनुयायांमध्ये धर्माचा प्रचार करतात. यांच्या मंडपांमध्ये वेद, योग आणि ध्यान यांचा अभ्यास करवून घेतला जातो.
इ. सामाजिक समरसतेचा संदेश : आखाडे हे जाती, वर्ग, स्थानिक भेदभाव यांच्या पलीकडे जाऊन सर्वांना समान दृष्टीने पहातात.
४. आखाड्यांची सामाजिक भूमिका
आखाडे हे केवळ धार्मिक संस्था नसून ते समाजातील प्रत्येक वर्गाला जोडण्याचे कार्य करतात.
अ. शिक्षण आणि जागृती : आखाडे वेद, उपनिषदे आणि धर्मग्रंथ यांचे अध्ययन अन् प्रचार यांमध्ये योगदान देतात.
आ. धर्मांतराला विरोध : आखाडे धर्मांतर रोखण्याविषयी समाजात जागृती करतात.
इ. दान आणि सेवा : कुंभमेळ्यामध्ये आखाडे भंडारे, चिकित्सा शिबिरे आणि सेवा कार्ये यांचे आयोजन करतात.
ई. सामाजिक सुरक्षा: आवश्यकता असल्यास आखाडे समाजाच्या रक्षणासाठी उभे रहातात.
५. आधुनिक युगात आखाड्यांचे महत्त्व
अ. परंपरा आणि आधुनिकता यांचे संतुलन : आखाडे आजही परंपरागत धार्मिक विधींचे पालन करतात; परंतु युवकांना जोडण्यासाठी ते आधुनिक पद्धतींचा उपयोग करतात. योग, ध्यान आणि आयुर्वेद या क्षेत्रांमध्ये आखाड्यांची भूमिका वाढत आहे.
आ. युवकांना प्रेरणा देणे : आखाडे समाजातील युवकांना धर्म आणि संस्कृती यांच्याविषयी जागृत करत आहेत. काही आखाडे युवकांना अमली पदार्थांपासून मुक्ती आणि मानसिक स्वास्थ्य यांसाठी प्रेरित करत आहेत.
६. आव्हाने आणि उपाययोजना
अ. आव्हाने :
१. धर्मांतर रोखणे आणि सांस्कृतिक रक्षण : धर्मांतराचे वाढते प्रकार आखाड्यांच्या अस्तित्वासमोरील एक आव्हान आहे.
२. आधुनिकता आणि धर्म यांच्यातील सामंजस्य : आधुनिक युगामध्ये आखाड्यांना युवकांना जोडण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील.
३. अंतर्गत वाद : काही आखाड्यांमध्ये अंतर्गत वादही दिसून येतात.
आ. उपाययोजना :
१. धर्म आणि समाज यांसाठी एकजूट : आखाड्यांनी समाज आणि धर्म यांविषयीच्या सेवेवर लक्ष देण्यास प्राधान्य दिले पाहिजे.
२. युवकांची भागीदारी : आखाड्यांनी युवकांसाठी योग, ध्यान आणि धर्मशिक्षण यांसारखे कार्यक्रम ठेवले पाहिजेत.
३. धर्मांतराच्या विरोधात मोहीम : धर्मांतर रोखण्यासाठी आणि धर्माचे रक्षण करण्यासाठी आखाड्यांना सक्रीय रहावे लागेल.
७. आखाडे कुंभमेळ्याचा आत्मा आणि धर्माची अमरता
आखाडे कुंभमेळ्याचा आत्मा आहे. हे केवळ साधूसंतांचे संघटन नव्हे, तर धर्म, संस्कृती आणि समाज यांचे पहारेकरी आहेत. आखाड्यांनी नेहमी धर्माचे रक्षण आणि समाजात जागृती पसरवण्याचे कार्य केले आहे. कुंभमेळ्यामध्ये आखाड्यांची भूमिका केवळ धार्मिक नाही, तर आध्यात्मिक आणि सांस्कृतिक आहे. आजच्या युगात आखाड्यांनी प्रासंगिकता राखण्यासाठी युवकांना समाज आणि धर्म यांविषयी स्वतःची भूमिका अधिक सशक्त करावी लागेल. आखाडे, म्हणजे परंपरा आणि आधुनिकता यांना जोडून धर्माची अमरता सुनिश्चित करणारी सनातन धर्माची साखळी आहे.
– डॉ. सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनी.