Prayagraj Airfare : प्रयागराजला जाणार्‍या विमानांची भाडेवाढ न्यून करा !

‘सुराज्य अभियाना’कडून केंद्रीय नागरी वाहतूक मंत्री आणि अन्न सार्वजनिक वितरण मंत्री यांना निवेदन देऊन करण्यात आली मागणी

मुंबई – प्रयागराज येथे चालू असलेल्या महाकुंभमेळ्यासाठी जाणार्‍या विमानांसाठी अधिक भाडे आकारण्यात येत आहे. या समस्येवर अधिकार्‍यांनी केवळ सूचना करणे पुरेसे नाही. वाढीव भाडे नियंत्रित करण्यासाठी सरकारने धाडसी आणि निर्णायक कारवाई केली पाहिजे. विशेषतः कुंभमेळा, सुट्या आणि निवडणुका यांसारख्या प्रसंगांच्या वेळी होणारी भाडेवाढ सरकारने नियंत्रित केली पाहिजे, अशी मागणी ‘सुराज्य अभियाना’कडून केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापु राममोहन नायडू आणि अन्न अन् सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सुराज्य अभियानाने केलेल्या मागण्या

१. विमान भाडेवाढीवरील नियम सर्व ऑनलाईन आरक्षण मंचांवर लागू केले जावेत. या मंचांवर भाडे संरचना उघड करणे आणि मागणीच्या काळात भाड्यांमध्ये फेरफार टाळणे आवश्यक आहे.

२. ‘डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिगेशन’ने एक नियामक प्राधिकरण म्हणून काम केले पाहिजे.

३. ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सींना पारदर्शकता राखण्यास आणि नैतिकदृष्ट्या तिकिटांच्या किमती निश्चित करण्यास भाग पाडले पाहिजे. विशेषतः महाकुंभमेळा आणि अन्य प्रमुख कार्यक्रमांमध्ये प्रवास करणार्‍या भाविक आणि यात्रेकरू यांसाठी हे करणे आवश्यक आहे.

४. अन्याय्य भाडेवाढ रोखण्यासाठी आणि भाविक आणि यात्रेकरू यांना अशा शोषणकारी किंमत पद्धतींपासून संरक्षण देण्यासाठी आम्हाला कडक नियमनाची आवश्यकता आहे.