येत्या ५ वर्षांत स्वमालकीच्या २५ सहस्र लालपरी बसगाड्या घेणार !

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तत्त्वतः मान्यता !

  • भविष्यात ‘गाव तिथे एस्टी’ धावणार

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई – येत्या ५ वर्षांत स्वमालकीच्या २५ सहस्र नव्या लालपरी बसगाड्या घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे, असे विधान परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. २७ जानेवारी या दिवशी परिवहन विभागाची आढावा बैठक पार पडली. या वेळी ते बोलत होते.

१. सध्या राज्य परिवहन महामंडळाकडे केवळ १४ सहस्र ३०० बसगाड्या असून त्यापैकी १० वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या १० सहस्र बसगाड्या आहेत. पुढील ३-४ वर्षांत त्या प्रवासी सेवेतून बाद होतील.

२. एस्.टी.ला आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने प्रतिवर्षी ५ सहस्र लालपरी बसगाड्या याप्रमाणे ५ वर्षांमध्ये २५ सहस्र बसगाड्या घेण्याची योजना आखली असून त्याला अर्थमंत्र्यांनी अनुमती द्यावी, असा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला उपमुख्यमंत्र्यांनी तत्त्वतः मान्यता दिली.

३. वर्ष २०२९ मध्ये २५ सहस्र बसगाड्या आणि ५ सहस्र इलेक्ट्रिक बसगाड्या याप्रमाणे ३० सहस्र बसगाड्यांचा ताफा महामंडळाकडे असेल. भविष्यात ‘गाव तिथे एस्टी’ आणि ‘मागेल त्याला बस फेरी’ देऊ शकतो, असेही सरनाईक म्हणाले.