उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे भाविकांनी दिलेले दान मंदिर निर्माणासाठी वापरले जाणार !

त्र्यंबकेश्वर येथे वारकरी संवाद कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला !

नाशिक – संत श्री निवृत्तीनाथ महाराज पौष वारीच्या शासकीय महापूजेस २५ जानेवारी या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समवेत उपस्थित रहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी बांधवांशी संवाद साधला. विशेष म्हणजे नियोजित दौर्‍यात नसतांनाही गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देत दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यापूर्वी भाविकांकडून उपलब्ध होणार्‍या दानातील रक्कम एकत्र करून मंदिर समितीच्या खर्चातून यात्रा कालावधीत मंडप आणि अन्य मूलभूत सुविधा यासाठी संपूर्ण व्यय केला जात होता; मात्र एकनाथ शिंदे यांच्या निर्णयामुळे भाविकांनी दिलेले दान थेट मंदिर निर्माणासाठी वापरले जाणार आहे.

शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितलेली संवादातील महत्त्वपूर्ण सूत्रे !

१. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशाने यंदा २२ लाख रुपयांपेक्षा अधिकचा यात्रा निधी भाविकांच्या मूलभूत सोयीसाठी देण्यात आला आहे. गतवर्षी याविषयीच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. त्याची कार्यवाही योग्यरित्या यंदाही होत आहे आणि ती कायम राहील. वारकर्‍यांचे सरकार म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पहिले जात होते. वारकरी संप्रदायातील लक्षावधी वारकर्‍यांचे आशीर्वाद सदैव शिंदे यांच्या पाठीशी आहेत.

२. वारकर्‍यांच्या दिंडीस प्रतिदिंडी २० सहस्र रुपये अनुदान आम्हाला शिंदे यांनी दिले. यामुळे मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागतील वारकरी वर्गास लाभ घेता आला. वारीतील अपघातग्रस्त लोकांना विठ्ठल-रुक्मिणी विमा योजनेच्या माध्यमातून साहाय्य उपलब्ध करून मोठा निर्णय घेण्यात आला.

३. पौष वारीच्या संपूर्ण खर्चासाठी त्र्यंबक नगरपरिषदेस विशेष यात्रा निधी देण्यात यावा, अशी मागणी मागील वर्षी तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ‘शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना’ म्हणून मागणी केली होती. त्यानुसार तो निधी तात्काळ देण्यात आला.

४. पौष वारीनिमित्त लाखो भाविक श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरला येत असतात. या यात्रेचा संत श्रीनिवृत्तीनाथ महाराज संस्थानला कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त खर्च लागणार नाही, याची काळजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.