गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची तिलारी धरणाच्या कालव्याची पहाणी

पणजी, २४ जानेवारी (वार्ता.) – गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तिलारी धरणाच्या कालव्याची दोडामार्ग येथे पहाणी केली. या वेळी त्यांच्यासमवेत जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता बदामी आणि इतर कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्राच्या हद्दीतील तिलारी कालव्याच्या दुरुस्तीविषयी
लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या कालव्याविषयी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्राच्या हद्दीतील ३० किलोमीटर लांबीचा तिलारी कालवा वारंवार नादुरुस्त होतो. याचा परिणाम गोव्यातील पाणीपुरवठ्यावर होत आहे. या कालव्याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. यासाठी मी आणि मंत्री सुभाष शिरोडकर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. या वेळी आम्ही तिलारीविषयी संयुक्त बैठक घेण्याविषयी चर्चा करणार आहोत. तिलारी धरण प्रकल्प हा उत्तर गोव्यातील मोठ्या भागाकरता पाणी पुरवणारा जीवनदायी प्रकल्प आहे. या धरणाच्या २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याची पुनर्रचना करून तो बळकट करण्यासाठी आणि चांगल्या दर्जाचा पाण्याचा पुरवठा होण्यासाठी गोवा सरकारने १२८ कोटी रुपये संमत केले आहेत. यामुळे अस्नोडा, गिरी, पिळर्ण, चांदेल, मोपा आणि धारगळ येथील पाणी प्रक्रिया प्रकल्पांना अव्याहतपणे पाणीपुरवठा होईल. यासंबंधीचे अर्धे काम पूर्ण झाले असून उर्वरित काम ठरवलेल्या समयमर्यादेमध्ये पूर्ण करण्यात येईल. पुढील २५ वर्षांसाठी पाण्याची
वाढती मागणी पूर्ण होऊन कोणताही अडथळा न येता पाणीपुरवठा होण्यासाठी तिलारी कालव्याची देखभाल करणे आणि तो अद्ययावत करणे, यांसाठी गोवा सरकार बचनबद्ध आहे.’’