मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

पणजी, २३ जानेवारी (वार्ता.) – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २३ जानेवारी या दिवशी देहली येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना गोव्यातील विकासकामांसंबंधी पूर्ण पाठिंबा आहे. यापुढेही असाच पाठिंबा रहाणार, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना या भेटीच्या वेळी दिली.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गेले २ दिवस देहली भेटीवर आहेत आणि या वेळी त्यांनी अनेक केंद्रीय नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. देहली विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर गोव्यात मंत्रीमंडळ फेररचना होणार आहे. गोव्यातील वर्ष २०२७ ची विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीच्या वेळी राज्य सरकारने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली, तसेच सदोदित केंद्राकडून लाभलेल्या पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. ‘राज्याचा विकास आणि प्रगती अधिक गतीने होण्यासाठी पंतप्रधान मोदी यांचे अमूल्य मार्गदर्शन आणि हातभार कायम लाभावा’, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

होंडा, सत्तरी येथे हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे आश्वासन

पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी देहली भेटीच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचीही भेट घेतली. या भेटीच्या वेळी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी होंडा, सत्तरी येथील हेलिकॉप्टर दुरुस्ती प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दिली. या भेटीच्या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना गोव्यात नौदल आणि भूदल यांच्या कह्यात असलेल्या भूमींविषयीही चर्चा केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी घेतली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची भेट भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष दामोदर (दामू) नाईक यांनी २३ जानेवारी या दिवशी देहली येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही उपस्थित होते. या भेटीच्या वेळी दामू नाईक यांनी गोव्यात अलीकडेच झालेल्या पक्षाच्या सदस्य नोंदणीविषयी माहिती दिली. आगामी काळात पक्ष संघटन आणखी बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवणे आदी अनेक विषयांना अनुसरून केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी
माहिती दिली.