‘माझ्या आईचे निधन झाले आहे’, असे मला समजल्यावर एक क्षण मला वाटले, ‘माझ्या देहात प्राणच राहिला नाही.’ मी खाली बसले. त्या वेळी मी गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि श्रीकृष्ण यांना सूक्ष्मातून विचारले, ‘मी काय करू ? मी घरी गेल्यास माझा दादा मला साधना करू देणार नाही आणि मी घरी गेले नाही, तर मला आईचे अंत्यदर्शन होणार नाही. मी माझे सर्वस्व गुरुदेवांच्या चरणी अर्पण केले आहे. मी स्वतःला एका फुलाप्रमाणे त्यांच्या चरणी वाहिले आहे. मी घरी गेले, तर ते फूल मी त्यांच्याकडून नेले, असे होईल आणि मला तसे होऊ द्यायचे नाही.’
तेव्हा मला श्रीकृष्ण आणि गुरुदेव यांनी सुचवले, ‘माझे ध्येय हिंदु राष्ट्राच्या निर्मितीत सहभागी होण्याचे आहे. मला ईश्वराची सेवा करायची आहे. मला गुरुदेवांच्या चरणांची धूळ बनून रहायचे आहे. देवाने मला जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटण्याची संधी दिली आहे. मी सेवा सोडून जाऊ शकत नाही. माझा जन्म गुरुदेवांच्या कार्यात सहभागी होण्यासाठी झाला आहे.’
नातेवाईक मला म्हणाले, ‘‘तुझ्या वडिलांचे निधन झाल्यावर तू आली नाहीस. तुझ्या आईचे निधन झाले आहे. तेव्हा तू काय करणार आहेस ?’’ तेव्हा मला जाणवले, ‘गुरुदेव हेच माझे आई-बाबा आहेत. मी माझ्या आई-बाबांच्या समवेतच आहे. साक्षात् ईश्वर माझे आई-बाबा आहेत.’
अशा प्रकारे गुरुदेवांनी मला परिस्थिती स्वीकारण्याची क्षमता दिली आणि मला स्थिर ठेवले. त्याबद्दल मी गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– एक साधिका (५.११.२०२३)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |